दादरच्या छत्रपती शिवाजी मंदिरात घुमला दशावताराचा गजर!

 ▪️श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळा’ला मानाचा ‘कोकण सन्मान पुरस्कार २०२६’ प्रदान

▪️’आम्ही कोकणकर’ संस्थेचा दिमाखदार सोहळा

मसुरे | झुंजार पेडणेकर

कोकणची लोककला आणि संस्कृती जपणाऱ्या ‘श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ, देवगड मुणगे – डोंबिवली’ या अग्रगण्य मंडळाला यंदाचा अत्यंत मानाचा ‘कोकण सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. ‘आम्ही कोकणकर’ या सामाजिक संस्थेच्या वतीने मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेश माने आणि श्री. डिंगणकर यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला.

▪️१२ वर्षांची अविरत सामाजिक व सांस्कृतिक सेवा

‘आम्ही कोकणकर’ या संस्थेचे संस्थापक श्री. कृष्णा नंदा शांताराम येद्रे यांच्या संकल्पनेतून ही संस्था मागील १२ वर्षांपासून अविरतपणे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. कोकणातील मातीशी नाते घट्ट ठेवून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आणि संस्थांचा बहुमान करण्यासाठी ही संस्था नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

याच कल्पकतेचा भाग म्हणून, दशावतार लोककलेची निरपेक्ष सेवा, सांस्कृतिक वारसा जपण्याची कर्तव्यनिष्ठा आणि समाजावरील त्यांचा व्यापक प्रभाव लक्षात घेऊन यंदा या मानाच्या पुरस्कारासाठी ‘श्री. प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळा’ची निवड करण्यात आली.

▪️”हा पुरस्कार माझ्या कलाकारांच्या घामाचा सन्मान!” – श्री. प्रकाश पांडुरंग लब्दे

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना मंडळाचे संचालक श्री. प्रकाश पांडुरंग लब्दे भावुक झाले. आपल्या मनोगतात ते म्हणाले:

“हा पुरस्कार केवळ माझा किंवा एका मंडळाचा सन्मान नाही, तर रात्रीचा दिवस करून, रात्र-रात्र जागून कोकणची ही लोककला जिवंत ठेवणाऱ्या माझ्या निष्ठावंत कलाकारांच्या घामाचा आणि कलेचा हा सन्मान आहे. दशावतार हा कोकणचा आत्मा आहे. आजच्या आधुनिक युगातही जेव्हा आमचे कलाकार रंगमंचावर उभे राहतात, तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारा आनंद आणि आदर आमच्यासाठी सर्वात मोठी पावती असते.

‘आम्ही कोकणकर’ संस्थेने आणि कृष्णा येद्रेजींनी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी, दादरच्या शिवाजी मंदिरात आमचा हा सन्मान करून दशावतार कलेला आणि आम्हा कलाकारांना मोठे बळ दिले आहे. आम्ही यापुढेही अत्यंत प्रामाणिकपणे, निरपेक्ष भावनेने ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू, हाच शब्द मी या निमित्ताने देतो.”

▪️दिग्गजांची उपस्थिती आणि कलाकारांचा सन्मान-

हा पुरस्कार स्वीकारताना श्रीदेवी भगवती पारंपारिक दशावतार नाट्य मंडळाचे संचालक श्री. प्रकाश पांडुरंग लब्दे आणि अध्यक्ष श्री. संतोष मेस्त्री यांच्यासोबत मंडळाचे अहोरात्र कष्ट घेणारे सर्व कलाकार उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने श्री. समीर नार्वेकर, श्री. सचिन परब, श्री. प्रशांत मालप, श्री. नारायण (बंटी) कदम, श्री. विवेक शिरसाट, श्री. चिराग नांदगावकर, श्री. प्रीतम केळुस्कर, श्री. अजय कदम, श्री. अक्षय गवस, श्री. यशवंत चव्हाण, श्री. विश्वदीप तांबे, श्री. अरविंद कांबळे, श्री. सिद्धेश (बबलू) गुरव, श्री. गुरुनाथ धुरी, श्री. संजय गवस, श्री. मंगेश आसोलकर, श्री. गणेश राणे, श्री. सखाराम तांबे, श्री. रोहित कदम आदी कलाकारांचा टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान करण्यात आला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ‘आम्ही कोकणकर’ संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. मुंबईत उपस्थित असलेल्या तमाम कोकणवासीयांनी या सोहळ्याला गर्दी करून कलाकारांचे मनोबल वाढवले.