सातोळी तिठा येथे विनापरवाना ७ गोवंशाची वाहतूक प्रकरणी पोलिसांची कारवाई

दोन वाहने जप्त : चार जणांवर गुन्हा दाखल

​सावंतवाडी:
सावंतवाडी तालुक्यातील सातूळी तिठा येथे विनापरवाना गोवंशाची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन गायी, तीन बैल आणि एक वासरू अशा एकूण ७ प्राण्यांची सुटका केली असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दोन्ही वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी चार जणांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक ६ जून रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास सातूळी तिठा येथे पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी केली. यावेळी राजापूरकडून कर्नाटकच्या दिशेने जाणाऱ्या ‘छोटा दोस्त’ (वाहन क्रमांक KA-31-A-3106) आणि ‘टाटा एस’ (TATA ACE) कंपनीचा टेम्पो (वाहन क्रमांक MH-09-CA-7816) या दोन वाहनांना पोलिसांनी थांबवले.

​या वाहनांची झडती घेतली असता, त्यामध्ये कोणतेही परवाने किंवा वैध कागदपत्रे नसताना अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे ३ गायी, ३ बैल आणि १ वासरू अशी एकूण ७ जनावरे वाहतूक करताना मिळून आली.

​या बेकायदेशीर वाहतूकप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये नागराज रामन्ना जैन (वय ४२ वर्षे), रामचंद्र नारायण सिद्धी (वय ४३ वर्षे, दोघेही राहणार – यल्लापूर, जिल्हा उत्तर कन्नड, राज्य कर्नाटक), अजित नारायण धवन (वय ३७ वर्षे, रा. न्हावेली चौकेकर वाडी, ता. सावंतवाडी) आणि प्रकाश बाळा कोरगावकर (वय ७१ वर्षे, रा. मळगाव कुंभार्ली रस्तावाडी, ता. सावंतवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

​पोलिसांनी कारवाई दरम्यान दोन्ही वाहने जप्त केली असून, सुटका करण्यात आलेल्या सर्व गायी, बैल आणि वासराला सुरक्षितपणे गोशाळेत रवाना केले आहे. याप्रकरणी ट्रॅफिक पोलीस जमादार श्री. आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात सर्व संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करीत आहेत.