विविध बँका व कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी
खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन : प्रमोद रावराणे यांची संकल्पना
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी येथे २० जुलै रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात विविध बँका आणि नामांकित कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा मेळावा येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे होणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी स्थानिक समितीचे सचिव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, संस्थेचे संचालक शरद रावराणे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. अजित दिघे, प्रा. डॉ. एम. ए. चौगुले, अधीक्षक संजय रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. चव्हाण म्हणाले, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय तसेच परिसरातील इतर महाविद्यालयांतील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने यंदा महाविद्यालयाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. २० जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणाऱ्या रोजगार मेळाव्यात विविध बँका आणि नामांकित कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी आतापर्यंत १५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. याशिवाय करिअर मार्गदर्शन, रोजगार व स्वयंरोजगाराविषयी माहिती, तसेच कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.२०२३ ते २०२६ या कालावधीत पदवी पूर्ण केलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यासाठी पात्र असतील. स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला असून, याच दिवशी अन्य विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. चव्हाण म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने दीर्घकालीन नियोजन सुरू असून, स्थानिक युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योगाच्या संधी उपलब्ध करून देणारी सक्षम व्यवस्था उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुढील तीन वर्षांत या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फोटो : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण













