भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष पपू परब यांची खासदार नारायण राणे यांच्याकडे मागणी
वेंगुर्ले : दाजी नाईक
मडगाव–वेलांकणी एक्सप्रेस (गाडी क्र. १७३१५) ही गाडी मडगावऐवजी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून सुरू करावी किंवा पूर्वीप्रमाणे सावंतवाडी रोड स्थानकावर अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मडगाव–वेलांकणी एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून एकदा धावते. पूर्वी या गाडीसाठी सावंतवाडी रोड स्थानकावर अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र, २०२२ पासून ही सुविधा बंद करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांसाठी वेलांकणी हे अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, विशेषतः सप्टेंबर महिन्यातील यात्रेसाठी हजारो भाविक सिंधुदुर्गातून वेलांकणीकडे जातात. सध्या त्यांना मडगावपर्यंत जाऊन रेल्वे पकडावी लागत असल्याने वेळ, खर्च आणि गैरसोयीचा मोठा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे मडगाव–वेलांकणी एक्सप्रेस सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्याबाबत किंवा पूर्वीप्रमाणे सावंतवाडी रोड स्थानकावर अतिरिक्त डबे जोडण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विष्णू उर्फ पप्पू परब यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे. निवेदन देताना परब यांच्या सोबत सायमन आल्मेडा उपस्थित होते.













