सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जाधव यांच्या पाठपुराव्याला यश
लांजा (प्रतिनिधी): सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे
गेल्या वर्षभरापासून बंद असलेली ‘लांजा-कुवे-इंदवटी’ ही एसटी बस फेरी १५ जुलै पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे . स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळत असून, ही बस सेवा पूर्ववत सुरू झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
लांजा-कुवे-इंदवटी हा रस्ता तयार करण्यात आल्यानंतर सुमारे ४० ही बसफेरी सुरू करण्यात आली होती. सलग चार दशकांहून अधिक काळ ही बस परिसरातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी ठरली होती . मात्र, कोरोना काळात ही बसफेरी बंद झाल्यानंतर विविध कारणांमुळे ती पुन्हा सुरू होऊ शकली नव्हती. परिणामी, गेल्या वर्षभरात विद्यार्थी, नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन
सामाजिक कार्यकर्त्या वैशाली जाधव यांनी लांजा एसटी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अनेक स्तरांवर केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून लांजा आगारामार्फत बुधवारी १५ जुलैपासून ही बस सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सोयीचा विचार करून बसच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. पूर्वी दुपारी २.४५ वाजता लांजाहून सुटणारी बस आता दुपारी ३.०० वाजता सुटणार आहे.
दरम्यान, वर्षभरानंतर गावात दाखल झालेल्या या एसटी बस फेरीचे ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. चालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्रीफळ वाढवून बस फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी इंदवटी व वनगुळे येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैशाली जाधव यांच्यासह दत्तू इंदवटकर, कमलाकर इंदवटकर, प्रसाद भगते, दिलीप भगते, रामचंद्र भगते, विजया घाग, शारदा जाधव, प्रमया जाधव, अनुसया भुवड, विनया खामकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, बस सेवा पुन्हा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, ही सेवा केवळ नियमित दिवसांपुरती मर्यादित न ठेवता शाळा-कॉलेजच्या सुट्यांमध्ये तसेच सणासुदीच्या काळातही अखंड सुरू ठेवावी आणि भविष्यात कोणत्याही कारणास्तव बंद करू नये, अशी आग्रही मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.













