चंद्रशेखर तेली, जामसंडे
कातळ सड्यावरची भातशेती तर पावसाच्या लहरींमुळे पोटरीवर येतायेताच ,आपली पात पिवळी करू लागली होती. ऑक्टोबर हिट आपली चाहूल दाखवू लागली होती. भाद्रपदात होणारी भातकापणी बरीच लांबत चालली होती. नवरात्रीच्या उत्सवाची सुरुवात अगदी एका दिवसावर येऊन थांबली होती.
दारातल्या अंगणात पिवळ्या झेंडूची फुले एकमेकांची गळाभेट घेत, वाऱ्याच्या झुळुकीबरोबर एका लयीत डोलत होती .पडवीतल्या झोपाळ्यावर बसलेले रघुकाका त्यांच्याकडे पाहत ,उद्याच्या नवरात्रीच्या पूजेची तयारी कशी करायची असा मनात विचार करीत होते. याहीवर्षी शेजारच्या खानविलकरांच्या रमेशलाच बोलावून देवीची पूजा मांडा वी ,घटस्थापना करून घ्यावी असे मनाशी म्हणत अंगणात आले.दारातल्या आंब्याच्या झाडाच्या अंगणात पडलेल्या पिवळ्या पानांबरोबर उगीच स्वतःची तुलना करू लागले.
पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा वसंत पोटापाण्यासाठी बायको व दोन वर्षाच्या मुलासह अहमदनगरला गेला. तिथेच स्थिरस्थावर झाला. त्याने कोकणातल्या घराकडे इतक्या वर्षात मागे वळून पाहिले नाही. सणासुदीला सुद्धा बायको मुलांसह घरी आला नाही. मात्र काही वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने आई गेल्याचे कळताच शेवटच्या चार दिवसांसाठी एकटाच आला होता. आई गेल्यावर मात्र ठराविक महिन्यांनी रघूकाकांना पैसे पाठवून आपले कर्तव्य करीत राहिला. एक गोष्ट चांगली झाली होती,अलीकडे त्याच्या कुटुंबियांची फोनवर खुशाली समजत होती. पण तीही रघूकाकांनी फोन केला तरच. रघूकाकाही त्यांच्याकडे कधी गेले नाहीत. घर, शेतीवाडी आणि आपण एव्हढेच त्यांचे जग होते.
आज मात्र पडवीतल्या झोपाळ्यावरून उठून पूजेचा विचार करीत अंगणात येऊन उभे राहिले तेव्हा, अनपेक्षितपणे अंगणात पावलांच्या आवाजाबरोबर आजोबा sss अशी हाक त्यांच्या कानावर आली. मान वळवून बघतात तर अंगणात त्यांचा नातू ‘निनाद ‘ उभा होता. रघूकाका आश्चर्यचकित झाले. भानावर आले. त्यांनी नातवाला अंगणातच मिठी मारली. जवळजवळ दोन तपानंतर ते त्याला प्रत्यक्ष पाहत होते. एरव्ही कधीतरी व्हाट्सअप वर पाहिलेली छबी ते एकटक नजरेनं न्याहाळू लागले. निनादला घेऊन घरात आले.
ग्रामदेवता भगवतीनेच आपल्या पूजेची व्यवस्था केली याच्या आनंदात रघूकाकांना गहिवरून आले. झोपाळ्यावर बसलेल्या निनादच्या चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा हात फिरवीत मुलाची, सुनेची खुशाली विचारत राहिले.
रात्री जेवण झाल्यावर रघूकाकांनी निनादला उद्याच्या नवरात्रीच्या पूजेची ,घरातल्या घटस्थापनेची माहिती दिली. निनादही तयारीला लागला. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली देवांची पूजा करून त्याने देव्हाऱ्यात नवरात्रीची पहिली माळ बांधली.
दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी …… आरतीचे रघूकाकांचे उत्साहातले स्वर
घरात ऐकू येऊ लागले. निनादही त्याच्यामागून जमेल तशी चकी वाजवून सूर धरू लागला.
घरी आल्यानंतर दोन तीन दिवसांनंतर ,एका संध्याकाळी एकत्र बसून चहा पिताना, विशेषतः तळ कोकणातली दसरा सण साजरी करण्याची प्रथा कशी आहे याबद्धल निनादनेच रघूकाकांना सहज विचारले होते. त्यावर रघूकाका म्हणाले, ” होय, आता भगवती, रामेश्वराच्या मंदिरात ढोल वाजतील .गावातल्या देवाधर्माच्या कामांना सुरुवात होईल. गावचे पुजारी, गावकरी आपल्या भागातले घाडी, गुरव व इतर मानकरी एकत्र येऊन देवांना दसऱ्यादिवशी सीमोल्लंघनाला घेऊन जातील.शिवलग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडतील. सर्व गावघरातील लहानथोर यावेळी मंदिराकडे जमतील. मंदिराचे गावकर मानकरी सगळ्या रयतेसमोर शिवकळेला हाक मारून कुडीच्या अंगात प्रवेश करण्यासाठी भक्तिभावाने निमंत्रित करतील. ढोलांचा नाद मंदिर परिसरात घुमेल. त्याला घंटा नादाची साथ मिळेल. त्या धीरगंभीर वातावरणात ” लेकरा ,आज कशाक हाक मारलंस ? माझी रयत रोम्बावळ हजर आसा ना ? ..”अशी चौकशी करीत पंचायतानातील दैवते हजर होतील. खांद्यावरचे तरंग झुलवित घुमू लागतील.”रघूकाकांनी केलेले वर्णन ऐकून निनाद अवाक होऊन ऐकत राहिला. रघूकाकाही त्या क्षणात रमून गेले.
“आजोबा जरा थांबा, मी माझ्याकडे या गोष्टींचे टिपण घेतो. मध्येच निनाद म्हणाला. ” हो चालेल’ आत्ताची नवीन पिढी खूप हुशार आहे पण गावरहाटी या विषयाबद्दल नव्या मुलांच्या मनात उदासीन पणा आला आहे .” असे बोलत रघुकाकांनी निनादकडे हसून पाहिले .निनाद आता टिपणे घेऊ लागला. म्हणाला , “आजोबा ग्राम संस्कृतीबरोबर गावाचे ऐक्य ,एकोपा नांदावा म्हणून साजरा केला जाणारा हा दसरा सण आपल्या कृषी संस्कृतीशी जोडला गेला आहे काय ? तुम्हीच म्हणाला होतात ,दसऱ्याच्या दिवशी शेतातून आणलेल्या भाताच्या व वरीच्या लोंब्या दरवाजावर बांधून कृतज्ञता व्यक्त करायला हवी.” रघु काकांना हे ऐकून बरे वाटले ते सांगू लागले. “या नवरात्रीतही आपली कृषी संस्कृती निगडित आहे. देवीच्या घटाजवळ जे बियांचे रुजवण घातले आहे ते याचसाठी आहे. शेतकरी आपल्याकडील तयार झालेल्या शेतातल्या बी बियाण्याची परीक्षा या माध्यमातून घेत असतो. या नऊ दिवसात जर धान्य संपूर्ण उगवले तर ते उगवण क्षमता असलेले आहे असे समजले जाते .जर ते नीट उगवले नाही अंशतः उगवले तर ते बियाण्यासाठी उपयुक्त नाही असे समजले जायचे .पूर्वीच्या काळी आत्तासारखी बियाणी संवर्धनाची आधुनिक पद्धती नव्हती. तरीही ती काळाच्या कसोटीवर उतरलेली होती. निनादला ही महत्त्वाची बाब समजली होती. तसं पाहिलं तर हा नाविन्याचा काळ. भाताचे नवीन पीक घरात आल्यावर त्याची अश्या पद्धतीने परीक्षा घेतली जायची हे ऐकून निनाद भलताच खुश झाला. शेतात पोटी फुटेपर्यंत काम करणाऱ्या शेतकऱ्याविषयी त्याच्या मनात वेगळाच आदर निर्माण झाला . बोलण्याच्या ओघात रघु काका निनादला दसऱ्याच्या वार्षिकाच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने वाटली जातात याबद्दलची कथा सांगू लागले. निनाद लक्षपूर्वक ऐकू लागला.
गुरु शिष्य परंपरेला ही कथा कशी पूरक आहे हे सांगताना रघुकाका म्हणाले, “आज तुमची ऑनलाईन शिक्षण व्यवस्था उदयास आली असली तरी त्यातही गुरु व शिष्य हे नाते तसेच आहे .वरतंतू नावाचे ऋषी आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करीत असत .त्यांचा एक कौत्य नावाचा शिष्य होता. ज्ञानार्जनानंतर त्याने वरतंतु ऋषींनी शिष्यांकडून गुरुदक्षिणा घ्यावी म्हणून हट्ट धरला. गुरूंनी त्याच नकार दिला. तरीही कौत्य ऐकायला तयार नाही म्हणून त्यांनी चौदा विद्या शिकवल्या त्यासाठी चौदा कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली. सहज शक्य गोष्ट आहे असे वाटून त्याने यासाठी राजा रघुराजाकडे मागणी केली. पण रघुराजाही यासाठी असमर्थ ठरला. परंतु याचकाला रिक्त हस्ते कधीही न पाठवलेल्या रघुराजांनी कौत्याला तीन दिवसानंतर पुन्हा बोलावले. व यासाठी कुबेराच्या खजिन्यावर स्वतः स्वारी करण्याचे ठरवले .कुबेराला हे कळतात त्याने अयोध्येत सुवर्णमुद्रांचा पाऊसच पडला. यातून चौदा कोटी सुवर्ण मुद्रा गुरु वरतंतू यांना गुरुदक्षिणा म्हणून त्याने दिल्या. तो अश्विन शुद्ध दशमीचा दिवस होता. ज्या वृक्षावर या सुवर्णमुद्रा पडल्या ते झाड होते आपट्याचे ! त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटायची प्रथा आहे.”गुरु शिष्य परंपरेतून या नवरात्रीत माता सरस्वतीचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. तिचे पूजनही या काळात केले जाते. आपल्याकडील शाळेत सरस्वती पूजन केले जाते.” अहमदनगरच्या शाळेत केलेले सरस्वती पूजन निनादला आठवले. मात्र गुरु शिष्य परंपरेचा विचार या ऑनलाइन शिक्षणाच्या काळातही जसाच्या तसा टिकून आहे याचे महत्त्व मात्र आज रघुकाकांनी सांगितलेल्या कथेतून त्याला उमगले. हे बोलत असताना , रघुकाकांकडे शेजारचे दोघेजण काही कामासाठी आल्याने हा आजोबा नातवामधला संवाद तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळी देवीची पूजा केल्यानंतर रघुकाका निनादला सड्यावरची शेती व हापुसची कलमे दाखवण्यासाठी घेऊन गेले. मोजकीच पण दगडी अळी बांधलेली हापुसची कलमे बघून निनाद हरखून गेला. पण घरचे मनुष्यबळ नाही म्हणून या शेतीवाडीची उस्तवार करता येत नाही याची खिन्नता आजोबांच्या चेहऱ्यावर पाहताना काहीसा खजिलही झाला .घरी आल्यावर निनाद आजोबांना विचारू लागला . ” आजोबा तळ कोकणातल्या दसऱ्याच्या उत्सवाविषयी मला तुम्ही सांगत होतात, तो विषय काल अपुरा राहिलाय .दसऱ्या दिवशी देव अवसर खांद्यावर तरंग मुखवटे घेऊन घुमू लागतात त्यानंतर काय केले जाते त्याबद्दल सांगा.” निनादची उत्सुकता फार न ताणता रघुकाका सांगू लागले, “ऐक निनाद, या दिवसाला विजयादशमी म्हणतात याच दिवशी रावणाचा वध प्रभू श्रीरामांनी केला. या दिवशी नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मानतात .या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. दसऱ्याला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्वही आहे .आपल्या कोकण भागातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात हा सण साजरा होत असताना काहीशी भिन्नता ही जाणवते परंतु सर्वसाधारणपणे आपल्या बऱ्याचशा भागात गावातील मंदिरात खांबकाठी घेऊन देवांना वाजत गाजत गावच्या सीमेवर घेऊन जातात .सोबत सर्व जनता असते त्या ठिकाणी देवाच्या शिव लग्नाचा सोहळा पार पाडला जातो. गावचे घाडी किंवा गुरव इतर मानकऱ्यांसोबत देवांना गाऱ्हाणे घालतात .आपट्याच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घालून देव स्वतः सोने लुटतात .त्यानंतर उपस्थित जनतेचा जमाव सोने लुटतो. एकमेकांना सोने देत घेत पुन्हा वाजत गाजत देवाची पालखी देवळात नेली जाते .संपूर्ण कोकणात उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण सोहळा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे .आमच्या जगण्याला हूरूप देणारे एक अप्रतिम माध्यम आहे .आपपरभाव गळून पाडणारा हा सण जगण्याला नवी उभारी देतो .” रघुकाकाही हे सांगताना भावुक होतात.
दसऱ्याच्या आदल्या दिवशी निनाद आजोबांना घेऊन बाजारात जातो. त्यांच्यासाठी व स्वतःसाठी नवे कपडे खरेदी करतो. दसऱ्यादिवशी मंदिर परिसर न्याहाळत सीमोल्लंघनाच्या सणात सहभागी होतो. ढोलावर पडलेल्या प्रत्येक काठीगणिक मनाने समृद्ध होत जातो. भारावतो. गाभाऱ्यात समईच्या प्रकाशात उजळून निघालेल्या देवी भगवतीला मनोभावे नमस्कार करतो. आजोबांच्या पायावर डोके ठेवतो. “आता मी दरवर्षी येईन, आई बाबांना यायला भाग पाडीन.” असे आजोबांना सांगतो.
रघूकाका पाणावल्या डोळ्यांनी देवीच्या पाषाणाकडे पाहत राहतात . देवी गालात हसत असल्याचा त्यांना भास होतो. गाभाऱ्यातल्या पुजाऱ्याचे स्वर त्यांच्या कानी निनादतात….
सर्व मंगल मांगल्ये , शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते ..।।