देवगड : कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देवगड-जामसांडे येथे अभ्यासिकेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. MPSC व UPSC परीक्षांमध्ये कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याची खंत व्यक्त करत ही उणीव भरून काढण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अभ्यासिकेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे वातावरण, मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध होऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे सोपे होईल. पुढे प्रशासनात स्थानिक तरुण-तरुणींना संधी मिळाल्यास कोकणाच्या विकासाला गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले. अभ्यासिका दर्जेदार चालवण्यासाठी नामांकित संस्थांची मदत घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला.
यावेळी नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी आमदार अजित गोगटे, राजा भुजबळ, बुवा तारी, तनवी चांदोस्कर, शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, योगेश चांदोसकर, योगेश पाटकर, दया पाटील, विवेक खोत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.












