गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यासह १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
एलसीबीची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
कणकवली : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग (एलसीबी) पथकाने फोंडाघाट येथे गुरुवारी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास धाड टाकून गोवा बनावटीच्या अवैध मद्यसाठ्यावर कारवाई केली. या कारवाईत १ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद महादेव नराम (वय ५२, रा. हवेलीनगर, फोंडाघाट, ता. कणकवली) यांच्या घराच्या मागील बाजूस गोवा बनावटीच्या मद्याचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार टाकलेल्या धाडीत विविध प्रकारच्या गोवा बनावटीच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्यसाठ्याची किंमत १ लाख ३६ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान बंटी सावंत (वय ३५, रा. कणकवली) याचाही अवैध मद्य विक्रीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, पोलीस हवालदार आशिष गंगावणे तसेच पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर तवटे यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करीत आहेत.













