भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांची मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना सह-अध्यक्षपदी निवड

नियुक्तीनंतर खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांची भेट

आशीर्वाद घेत मानले आभार

कणकवली : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी सह-अध्यक्षपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा देवगड-शिरगावचे सुपुत्र संदीप साटम यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्यातील ९१ विधानसभा मतदारसंघांसाठी सह-अध्यक्षांची घोषणा केली असून, त्यामध्ये संदीप साटम यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

 

संदीप साटम यांची नियुक्ती केंद्रीय माजी मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या शिफारसीनंतर करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. नियुक्ती जाहीर होताच संदीप साटम यांनी खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच आगामी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करत आशीर्वाद घेतले.

 

भाजपच्या संघटनात्मक बांधणीत संदीप साटम यांनी जिल्हा सरचिटणीस म्हणून सक्रिय भूमिका बजावली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य, कार्यकर्त्यांशी असलेला समन्वय, तसेच विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये असलेला सहभाग लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

 

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व हंगामात वाहतुकीयोग्य रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीमालाची वाहतूक सुलभ करणे आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळकटी देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सह-अध्यक्ष म्हणून संदीप साटम यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असणार असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.