शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

देवगड तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

शिरगाव (प्रतिनिधी) : खरीप हंगाम २०२६ व रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत भात व नाचणी पिकांचा पीक विमा भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवगड तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत भात व नाचणीसह अधिसूचित पिकांना उत्पादनाधारित विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पीक विमा काढण्यासाठी शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) असणे, डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई-पीक पाहणी) अंतर्गत पिकाची नोंद करणे तसेच किमान ०.१० हेक्टर (१० गुंठे) क्षेत्राचा विमा उतरविणे बंधनकारक आहे. देवगड तालुक्यातील आठही महसूल मंडळांमध्ये भात व नाचणी ही अधिसूचित पिके आहेत.

भात पिकासाठी प्रतिहेक्टर ६५० रुपये तर नाचणीसाठी प्रतिहेक्टर ४०० रुपये इतका विमा हप्ता निश्चित करण्यात आला असून, अनुक्रमे ६५ हजार व ४० हजार रुपये विमा संरक्षण उपलब्ध आहे. विमा संरक्षित रकमेच्या केवळ १ टक्का हप्ता भरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

यंदाच्या सुधारित योजनेत ई-पीक पाहणी व फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हे आणि विमा अर्जातील माहितीमध्ये तफावत आढळल्यास अर्ज रद्द होणार आहे. तसेच किमान १० गुंठे क्षेत्र, मृत शेतकऱ्यांच्या नावाने विम्यास बंदी, सातबारा ऑनलाइन पडताळणी, आधार लिंक बँक खाते आणि नुकसान भरपाईसाठी पीक कापणी प्रयोग व पीक-पाणी नोंदणीला समान महत्त्व अशा महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ‘इफ्को टोकियो’ (IFFCO Tokio) या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकरी स्वतः ऑनलाइन, बँक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) मार्फत अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा १४४४७ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही आरती पाटील यांनी आवाहन केले आहे.