भारताचे महान्यायवादी आर. वेंकटरमाणी यांच्या शुभहस्ते सन्मान
केंद्रिय अन्वेषण विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल केले सन्मानित


सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील आजगांव गावचे सुपुत्र आनंद राजाराम पांढरे यांना सन २०२१ प्रजासत्ताक दिना निमित्त जाहिर झालेले विशेष सेवा पदक ( इंडियन पोलीस मेडल ) व राष्ट्रपतींचे प्रमाणपत्र भारताचे महान्यायवादी ( ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया) श्री. आर. वेंकटरमाणी यांच्या शुभहस्ते केंद्रिय अन्वेषण विभाग ‘मुख्यालय, दिल्ली येथे शनिवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी एका ‘दिमाखदार सोहळ्या’त प्रदान करण्यात आले. सी.बी.आय. संचालक प्रविण सूत यांच्यासह अन्य मान्यवर व सी.बी.आय अधिकारी यांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा संपन्न झाला.
आजगांवचे माजी सरपंच तथा पोलीस पाटील कै. राजाराम विठ्ठल पांढरे यांचे कनिष्ठ पुत्र असलेल्या आनंद पांढरे यांचा जन्म आजगांव येथेच झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक-१ आजगांव तर माध्यमिक शिक्षण विद्याविहार इंग्लिश स्कूल आजगांव येथे झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इतर चाकरमानी मुलांप्रमाणेच १९८७ साली ते नोकरी निमित्त मुंबई येथे गेले.
त्यानंतर १९९० साली ते केंद्रिय अन्वेषण विभाग (CBI) मध्ये दाखल झाले. कॉन्स्टेबल’ पदावर रूजु झाल्यानंतर अत्यंत सचोटीने व मेहनतीने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर त्यांच्या प्रामाणिकपणा व अंगभूत असलेल्या चिकाटीमूळे ते “हेड कॉन्स्टेबल” पदापर्यंत पोहचले. सद्यस्थितीत ते कार्यालयात कर्तव्य अधिकारी (ड्युटी ऑफिसर ) म्हणून कार्यरत आहेत.

अंगभूत असलेल्या चतुराई व कौशल्य या त्यांच्या गुणांमुळे त्यांनी आजवर अजोड कामगिरी केली आहे. गुप्तचर विभागात कार्यरत असताना अनेक गुन्हेगारांची गुपीते व गुप्त माहिती त्यांनी आपल्या खात्यासाठी मिळवली आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगार गजाआड करण्यास मदत झाली आहे.
त्यांच्या याच कामगिरीमुळे त्यांना यापूर्वीही अनेकदा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सन २०११ मध्ये सीबीआय डे पुरस्कार, सन-२०१७ मध्ये बेस्ट डिटेक्टीव्ह अवार्ड (डी पी कोहली अवार्ड) असे अनेक उल्लेखनीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाल आहेत.
आई वडिलांचे संस्कार तसेच शिक्षक व गुरुजनानी केलेल्या संस्कारांमुळे व प्रामाणिकपणामुळे आपण इथपर्यंत पोहोचू शकलो असे ते आवर्जून सांगतात. त्यानी केलेल्या अजोड कामगिरी मुळे मिळालेल्या यशामुळे व त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे नातेवाईक व मित्रपरीवारासह सिंधुदुर्ग जिल्हयात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आनंद पांढरे यांना हे मानाचे पदक प्राप्त झाल्यानंतर आजगाव येथील त्यांच्या नातलगांनी तसेच ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. आनंद पांढरे हे आजगावचे सुपुत्र असल्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना भावी काळातही असेच उज्वल यश प्राप्त व्हावे अशा शुभेच्छा आजगाव येथील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.












