सावंतवाडीतील राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे तरुणाईत नवचैतन्य : ना. रविंद्र चव्हाण

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरात संदीप गावडे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे तरुणाईमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. दरम्यान एवढ्यावरच न थांबता जिल्ह्याचा सर्वागिण विकास झाला पाहीजे प्रत्येक गावाला वेगळी ओळख मिळाली पाहीजे यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. त्यासाठी संदिप गावडे सारख्या तरुण सहकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेत शुभेच्छा दिल्या.

भाजपचे युवा नेते संदिप गावडेंच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मान्सून चषक फुटबॉल स्पर्धेच्या समारोप प्रसंगी श्री. चव्हाण यांनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित खेळाडुंना मार्गदर्शन केले. मैदानी खेळाला विशेषतः फुटबॉलला जगभरात महत्व आहे. या खेळातील खेळाडुंना राष्ट्रीय स्तरावर चमकता आले पाहीजे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. संदिप गावडे व त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेवून सुरू केलेला हा उपक्रम अशाच पध्दतीने दरवर्षी चालविला जावा व त्यातून अनेक खेळाडू घडावेत, यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ते म्हणाले नुसती फुटबॉल स्पर्धा घेवून या ठीकाणी गावडे थांबले नाहीत तर त्यांनी सावंतवाडी फुटबॉल क्लब सुरू करण्याचा घेतलेला निर्णय हा स्तूत्य आहे. या क्लबच्या माध्यमातून भविष्यात अनेक खेळाडू घडावेत यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. तसेच हीरण्यकेशी नदीचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. भविष्यात त्याला व्यापक स्वरुप प्राप्त व्हावे आणि या अभियानात हीरण्यकेशी नदीच्या काठावर असलेल्या गावातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे चव्हाण यांनी आवाहन केले.त्याचबरोबर यावेळी श्री. गावडे यांच्या माध्यमातून गेळेगावचा आदर्श बंड या कोल्हापूर संघात खेळणाऱ्या विद्यार्थ्याला क्रिकेट किट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत,मंदार कल्याणकर, पंकज पेडणेकर, राजू राऊळ, निलेश तेंडुलकर, विनय केनवडेकर, श्रीपाद तवटे,हळदणकर, दिलीप भालेकर,समर्थ राणे, परिक्षित मांजरेकर, गुरुनाथ कासले, गणेश कुशे, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, रुपेश शिरा अमोल टेंबकर आदी उपस्थित होते.