आर्यन कांबळे याचे नीट परीक्षेत घवघवीत यश…

‘प्रयत्नांची उंची वाढवली की यशाचे शिखर गाठता येते हे आर्यन याने दिले दाखवून…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे 

 

 

कोल्हापूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल गुरुवारी १६ जुलै २०२६ रोजी रात्री उशिरा

जाहीर झाला आहे. यामध्ये कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मडुर येथे राहणाऱ्या कु.आर्यन बाळासो कांबळे या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केलं आहे. आर्यन कांबळे याने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षेत ७२० पैकी ५३० गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना आर्यन याने मिळवलेल्या यशाचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

आर्यनच्या या यशाने कुटुंबियांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले आहेत. त्याला कारण म्हणजे कुटुंबात कोणीही उच्च शिक्षित नाही.आई वडिलांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी मनात जिद्द व चिकाटीच्या जोरावर आर्यनने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

आर्यन’चे वडील बाळासो हे गारगोटी शहरातील एका हॉस्पिटल मध्ये कंपाऊंडर म्हणून काम करतात,तर आई किराणा (मिनी मॉल) दुकानात काम करत घर चालवते.या कुटुंबाने दिवसरात्र मेहनत करून मुलाच्या शिक्षणाला पाठबळ दिले.

मुलाच्या या यशामुळे सगळे कुटुंबीय आनंदित झाले असून आपल्या मेहनतीला फळं आल्याचे आर्यनच्या आई वडिलांनी सांगितले. प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या घरावर अवलंबून असते,ज्याप्रमाणे आपण घरातील वातावरण मुलांना देऊ,त्याचप्रमाणे मुलांची कृती आणि भूमिका असतात असे आर्यनचे आई वडील सांगतात.त्यामुळे मनाशी ध्येय असले तर गरिबी प्रगतीच्या आड येत नाही हे खरे.

‘प्रयत्नांची उंची वाढवली की यशाचे शिखर गाठता येते हे आर्यन याने दाखवून दिले आहे.

आर्यन कांबळे यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मित्रपरिवार, नातेवाईक आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात ते वैद्यकीय क्षेत्रात यशस्वी डॉक्टर बनून समाजसेवेचे कार्य करतील, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

आर्यनचे हे यश अनेकांना प्रेरणा देणारे आहे, त्याच्या पुढील शिक्षणासाठी दैनिक प्रहारकडूनही शुभेच्छा.