आंबोली गावठणवाडीत ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी १० लाखांची मागणी

आमदार दीपक केसरकर यांचे पालकमंत्र्यांना पत्र

सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोली येथील कमी दाबाच्या वीज समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र पाठवले असून, जिल्हा नियोजन समितीमधून १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

आंबोली हे पर्यटनासाठी प्रसिद्ध गाव असून दरवर्षी येथे हजारो पर्यटक येतात. मात्र, सध्या या भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेल्या उद्योगधंद्यांवरही याचा परिणाम होत असल्याची बाब आमदार केसरकर यांनी पत्रात नमूद केली आहे.

ग्रामपंचायत आंबोली अंतर्गत गावठणवाडी येथे १०० के.व्ही. क्षमतेचे नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. या कामासाठी संबंधित विभागाने तातडीने सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करावे आणि जिल्हा वार्षिक योजनेतून १० लाख रुपये मंजूर करावेत, अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास पर्यटन व्यवसायाला आणि स्थानिक उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे.