भुईबावडा कॉपी प्रकरणात गावची नाहक बदनामी : सर्व दोषींवर कठोर कारवाई करा

भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे यांची मागणी

वैभववाडी प्रतिनिधी
दहावीच्या भुईबावडा परीक्षा केंद्रावर उघडकीस आलेल्या कॉपी प्रकरणामुळे भुईबावडा गावाची नाहक बदनामी झाली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्यभरात ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रतिमेला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी भुईबावडा ग्रामपंचायतीचे सरपंच बाजीराव मोरे यांनी केली.

वैभववाडी पंचायत समिती कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत मोरे बोलत होते. यावेळी त्यांनी भुईबावडा गावातील नागरिकांच्या भावना व्यक्त करत या प्रकरणाचा निषेध केला .

    मोरे म्हणाले, दहावीच्या परीक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे संपूर्ण गाव बदनाम झाले आहे. या प्रकाराशी गावातील सर्वसामान्य नागरिकांचा कोणताही संबंध नसताना भुईबावडा गावाचे नाव राज्यभर चर्चेत आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना आहे.

या कॉपी प्रकरणामागे जे थेट दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र या गैरप्रकारामागे आणखी कोणी सूत्रधार, सहकारी किंवा लाभार्थी असतील, तर त्यांचाही शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी. तपास कोणत्याही दबावाखाली न होता निष्पक्ष आणि सर्वंकष व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेसाठी नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. तर जिल्ह्यात वैभववाडी तालूका अव्वल आहे. अशा परिस्थितीत या एका घटनेमुळे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या शैक्षणिक प्रतिमेला लागलेला कलंक पुसण्यासाठी प्रशासनाने दोषींना कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारचे गैरकृत्य करण्याचे धाडस कोणालाही होणार नाही, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.

भविष्यात परीक्षा केंद्रांवर अशा घटना घडू नयेत यासाठी अधिक प्रभावी आणि पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणीही सरपंच बाजीराव मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.