पोलिस, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रुजवला हरित महाराष्ट्राचा संकल्प

आसमगावात ५०० वृक्षांचे रोपण; महिलांच्या सहभागाने उपक्रमाला मिळाले सामाजिक बळ

कळे | प्रतिनिधी
प्रतापसिंह काळे

पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे, हा संदेश कृतीतून देत कळे पोलिस ठाण्याच्या पुढाकाराने पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथे ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानांतर्गत ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली. पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, शाळा, महिला आणि ग्रामस्थ यांच्या एकत्रित सहभागातून हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या लोकचळवळीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.
कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय अंमलदार अंकुश शेलार, विजय वायदंडे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत वृक्षारोपण केले.
उपक्रमात आसगावचे सरपंच श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, भैरव विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील पोलीस पाटील, कळे पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विशेष म्हणजे गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. सौ. कल्पना नामदेव पाटील (पणुत्रे), सौ. कविता अमित सुतार(घरपण), सौ. रेखा अशोक कांबळे (पिसात्री), सौ. सुरेखा पंडित कांबळे (कोदवडे) आणि सौ. सुरेखा अनिल पाटील (वाघुर्डे) यांनी स्वतःच्या हस्ते रोपे लावत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. त्यांच्या सहभागामुळे उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची अधिक बळकटी मिळाली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक हवामानाला पूरक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण न करता ‘लावलेले झाड जगविण्याचा’ निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला. प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटणारे वनक्षेत्र ही आजची गंभीर आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्थेबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपत पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच अनुकरणीय ठरत आहे.”एक झाड लावा… झाड जगवा,” हा संदेश देणारा आसमगावातील हा उपक्रम हरित महाराष्ट्राच्या दिशेने समाजाला नवी प्रेरणा देणारा ठरला.