अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात; सुदैवाने जीवितहानी टळली
स्वप्निल कदम-कुडाळ :
कुडाळ शहरातील पान बाजार परिसरातील क्षितिज अपार्टमेंटमध्ये असलेल्या एका वैद्यकीय लॅबला गुरुवारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लॅबमधील महागडी वैद्यकीय उपकरणे, साहित्य, कागदपत्रे तसेच इतर आवश्यक वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याचे लक्षात येताच तातडीने एमआयडीसी अग्निशमन दल तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. दोन्ही पथकांनी घटनास्थळी वेळीच धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग परिसरातील इतर दुकाने व इमारतींमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
या दुर्घटनेत लॅबमधील सर्व साहित्य, उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून नष्ट झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानंतरच आगीमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, या घटनेमुळे पान बाजार परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.













