बालकांच्या हस्ते केक कापून केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
२० जुलैला सावंतवाडीत होणार भव्य महाआरोग्य शिबीर
सावंतवाडी । प्रतिनिधी :“आमदार दीपक केसरकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले असून, जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हीच त्यांची खरी ताकद आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राबविले जाणारे सामाजिक उपक्रम हेच या प्रेमाची पावती आहेत,” असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. राज्याचे माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात शिवसेना व दीपक केसरकर मित्रमंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने संपर्क कार्यालयात बालकांच्या हस्ते केक कापून एक वेगळा आणि जिव्हाळ्याचा उपक्रम राबवत वाढदिवसाचा जल्लोष करण्यात आला. केसरकर यांनी कुटुंबियांसमवेत मुंबई येथे वाढदिवस साजरा केला असला, तरी त्यांनी फोनवरून सावंतवाडीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत शुभेच्छांचा स्वीकार केला.
या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात शैक्षणिक साहित्य वितरण, वृक्ष वितरण आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा रक्तदाता संघटना व नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय आणि महिला अंकुर केंद्रातील रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे आणि शाळांमध्येही वृक्ष वाटपासारखे विविध उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आले.
२० जुलैला मोफत महाआरोग्य शिबीर
या वाढदिवसाचे औचित्य साधून आगामी २० जुलै रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात जवळपास २२ हून अधिक सेवा दिल्या जाणार आहेत. १०० डॉक्टर उपस्थित राहणार असून गरजूंवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.
या संपूर्ण उपक्रमावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सभापती सुस्मिता जाधव, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, अशोक दळवी, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, नगरसेवक अजय गोंदावळे, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, भारती मोरे, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, अनारोजीन लोबो, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, गजानन नाटेकर, आबा केसरकर, विनोद सावंत, परिक्षीत मांजरेकर, अर्चित पोकळे, तात्या वेंगुर्लेकर, विश्वास घाग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













