आगरतळ्यातील घटनेनंतर तपास सुरू; मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही
तीन दशकांच्या सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे वरिष्ठ आयपीएस अधिकारी
त्रिपुराचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अनुराग धनकर सोमवारी आगरतळा येथील राज्य पोलीस मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळले. घटनेनंतर वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री माणिक साहा यांनी रुग्णालयाला भेट दिली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अनुराग धनकर हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
नवी दिल्ली : त्रिपुराचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अनुराग धनकर हे सोमवारी आगरतळा येथील राज्य पोलीस मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेनंतर मुख्यमंत्री माणिक साहा, मुख्य सचिव जे. के. सिन्हा तसेच इतर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दरम्यान, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
अनुराग धनकर हे 1994 बॅचचे त्रिपुरा केडरचे आयपीएस अधिकारी होते. डीजीपी (इंटेलिजन्स) म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर मे 2025 मध्ये त्यांनी त्रिपुराचे पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता.
तीन दशकांहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना पोलीस पदक तसेच विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरविण्यात आले होते.
अनुराग धनकर यांनी 1995 मध्ये त्रिपुरात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी लाँगथराई व्हॅलीचे एसडीपीओ, अविभाजित पश्चिम आणि दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, विशेष शाखेचे पोलीस अधीक्षक तसेच एआयजीपी (मुख्यालय) यांसारख्या विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले.
2003-04 दरम्यान त्यांनी कोसोवो येथील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनमध्ये सेवा बजावत आंतरराष्ट्रीय पोलिसिंगचा अनुभव मिळवला. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर काम केले.
2005 ते 2013 या कालावधीत त्यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मध्ये एसपी आणि डीआयजी म्हणून काम केले. त्यानंतर त्रिपुरात परतल्यानंतर 2013 ते 2016 या काळात आयजीपी (कायदा व सुव्यवस्था) म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
2016 ते 2023 या कालावधीत ते पुन्हा केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते. त्यांनी पोलीस संशोधन आणि विकास ब्यूरो (BPR&D), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) तसेच CBI मध्ये सहसंचालक आणि अतिरिक्त संचालक म्हणून विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.
याशिवाय 1984 च्या शीखविरोधी दंगलींच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) नेतृत्वही अनुराग धनकर यांनी केले होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस आणि प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.











