ग्रामीण मातीतून राष्ट्रीय यशाची भरारी; मल्हारपेठच्या समीरची नीटमध्ये देशात १७७ वी रँक

६८५ गुणांसह महाराष्ट्रात सहावा क्रमांक; जीवशास्त्रात ३६० पैकी ३६० गुण, एम्स नवी दिल्लीत एमबीबीएस प्रवेश निश्चित

प्रताप सिंह काळे

(कळे| प्रतिनिधी )

 

पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथील समीर अनुजा अभय जाधव याने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) मध्ये ६८५ गुण मिळवत देशात १७७ वी, तर महाराष्ट्रात सहावा क्रमांक पटकावला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवत कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

 

या उल्लेखनीय यशामुळे समीरची देशातील प्रतिष्ठित एम्स, नवी दिल्ली येथे एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे, जीवशास्त्र विषयात त्याने ३६० पैकी ३६० गुण मिळवत आपल्या अभ्यासातील सातत्य आणि गुणवत्ता सिद्ध केली.

समीरच्या यशामागे त्याची अथक मेहनत, शिस्तबद्ध नियोजन आणि कुटुंबाची भक्कम साथ महत्त्वाची ठरली. परीक्षेच्या तयारीदरम्यान त्याने जवळपास वर्षभर मोबाईल आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवत अभ्यासावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

समीरची आई डॉ. अनुजा जाधव यांनी मुलाच्या अभ्यासासाठी तब्बल दोन वर्षे स्वतःची ओपीडी बंद ठेवून त्याला मार्गदर्शन केले, तर वडील अभय जाधव यांनी प्रत्येक टप्प्यावर आवश्यक पाठबळ दिले. आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवत समीरने हे यश संपादन केले असून, त्याच्या यशामुळे संपूर्ण मल्हारपेठ गावात आनंदाचे वातावरण आहे.

 

*पालकांची प्रतिक्रिया*

समीरचे वडील डॉ अभय जाधव म्हणाले, “हे यश केवळ समीरचे नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाचे आणि त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ आहे. आम्ही त्याच्यावर कोणतेही अवास्तव दडपण न आणता त्याला योग्य वातावरण आणि प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागातूनही मोठी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, याचा आम्हाला अभिमान आहे.”

 

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी समीरचा संदेश”गावात राहूनही मोठी स्वप्ने पाहायला घाबरू नका. यशासाठी महागडी साधने नव्हे, तर सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. मोबाईल आणि सोशल मीडियाचा मर्यादित वापर करा, शिक्षकांवर विश्वास ठेवा आणि रोजच्या अभ्यासात सातत्य ठेवा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीला पर्याय नसतो. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये देशपातळीवर चमकण्याची क्षमता आहे.”