परोपकारी,धाडसी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सर्वांच्या ताई सौ. स्मिता सावंत यांचे दुःखद निधन!

फोंडाघाट मध्ये शोककळा !

फोंडाघाट /कुमार नाडकर्णी—

केवळ १४ वर्षाच्या वास्तव्यात,ग्रामपंचायत फोंडाघाट समोरील आपल्या घरातून सर्व फोंडाघाट वासियांच्या लाडक्या ताई बनलेल्या, सौ. स्मिता राजेंद्र सावंत (६५वर्षे ) यांचे मुंबई मुक्कामी असाद्य कॅन्सर आजाराशी झुंजताना दुःखद निधन झाले. ही बातमी गावात पसरताच ,प्रत्येक वाडी- बाजारपेठेत प्रचंड हळहळ व दुःख व्यक्त होत आहे..

 

 

फोंडाघाटचे राजेंद्र लक्ष्मण सावंत यांच्या त्या पत्नी ! अभ्युदय बँकेत काम करत असताना सन २००० मध्ये राजेंद्र यांनी गावी घर बांधले. आणि निवृत्तीनंतर २०१३ मध्ये ते येथेच वास्तव्यास होते. मात्र नियतीचा खेळ अजब असतो. सौ स्मिताताईंना तेरा वर्षांपूर्वी किडनी आणि लंग कॅन्सरचे निदान झाले. कित्येक अवघड केमोथेरपींना झुंजार आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्या सामोर्या गेल्या. परोपकारी, दातृत्वशील, दयाळू आणि सदैव निर्धारपूर्ण हास्य याच्या जोरावर फोंडाघाट- बाजारपेठ – मारुतीवाडी आणि पंचक्रोशीतील त्यांनी मित्र-मैत्रिणी परिवार जमवला. आपल्या असाध्य रोगाचा बाऊ न करता ” कंटाळा आलाss असे कधीही त्यांनी म्हटले नाही. आणि सानिध्यात येणाऱ्याला आपले स्वतःचे उदाहरण देऊन, माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर आनंदी- स्वच्छंदी राहू शकतो. याचे मूर्तीमंत उदाहरण दिले. आपल्या वडिलांची ल.जा. सावंत यांच्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये परिवाराला सुद्धा फोंडाघाट मध्ये स्थायिक घरे बांधून त्यांना राहण्यासाठी प्रोत्साहित करताना, सहकार्य केले. त्यांच्या झुंजार व्यक्तिमत्त्वाचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या लीलावती हॉस्पिटलच्या अन्कॉलॉजिस्ट डॉ. स्मृती यांनी इतर रुग्णांपुढे आदर्श ठेवत, कौतुक केले. मित्रपरिवारामध्ये त्या स्वयंपाक निपुण अन्नपूर्णा होत्या. बाजारपेठेतील त्यांचा फेरफटका समाजाभिमुख आणि मित्र परिवाराला हवाहवासा वाटत असे. इतरांना ऊर्जा देणाऱ्या सौ स्मिताताईंचा झुंजारपणा अखेर कॅन्सर व्याधीची लढा देताना पराभूत झाला. आणि त्यांनी १२ नोव्हेंबर रोजी मुंबई यांच्या तेथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला…

 

 

त्यांच्या ऊर्जा देणारा आणि लोकाभिमुख स्वभावामुळे फोंडाघाट परिसरात तीव्र दुःख व्यक्त होत आहे. सौ. स्मिता यांच्या पश्चात पती, मुलगे आणि भाऊ- बहिणी असा मोठा परिवार आहे. कोणीही अमर नाही. मात्र स्मिताताईंची पोकळी फोंडावासियांच्या सदैव आठवणीत राहील. अशी आदरांजली त्यांना वाहण्यात आली…