गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत ५० वर्षांपूर्वीच्या दशावतार कलेचा जागर;  गुरु-शिष्य परंपरेचा अनोखा सोहळा

सावंतवाडी | प्रतिनिधी :गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत फरा प्रतिष्ठान, आदर्शगाव केर आणि स्नेहबंध ग्रुप, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशावतारातील गुरु-शिष्य परंपरा वृद्धिंगत करणारा’ विशेष कार्यक्रम बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शिल्पग्राम, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या दशावतार कलेचा खडतर प्रवास, त्या काळातील कलाकारांची मेहनत, संघर्ष आणि कलेप्रती असलेली निष्ठा नव्या पिढीसमोर उलगडली जाणार आहे. आधुनिक सुविधांचा अभाव असलेल्या काळात कलाकार पुराणांचा अभ्यास कसा करीत, रंगभूषा, रंगकाम, संवादांची तयारी, प्रवास तसेच गाजलेल्या पदांची मांडणी कशा प्रकारे केली जात होती, याविषयी ज्येष्ठ कलाकार आपल्या अनुभवातून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे नवोदित कलाकारांना दशावताराच्या समृद्ध परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध होणार आहे.

 

कार्यक्रमाचे नियोजन दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग आणि हेळेकर दशावतार नाट्य मंडळ, कारीवडे यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी दशावतार क्षेत्रातील ऋषितुल्य ज्येष्ठ कलावंत मंगेश राणे, सुरेश गुरव, राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक, संतोष रेडकर आणि आनंद नार्वेकर यांचा पाद्यपूजन करून गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर ‘५० वर्षांपूर्वीचा दशावतार : खडतर प्रवास ते सोनेरी क्षण’ या विषयावर विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले असून, युवा कलाकार दत्तप्रसाद शेणई हे ज्येष्ठ कलावंतांशी संवाद साधणार आहेत.

 

याच कार्यक्रमात दशावतार स्मृती कलागौरव पुरस्काराने दिवंगत रामचंद्र बाबुराव राणे (बाबा राणे-कोनसकर) यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येणार असून, दशावतार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाला अभिवादन केले जाणार आहे.

 

कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ कलाकार आपल्या गाजलेल्या आणि रसिकप्रिय भूमिका सादर करणार आहेत. तसेच युवा कलाकारांकडूनही निवडक प्रसंगांचे सादरीकरण होणार आहे. दशावतार कलेचा सुवर्णकाळ अनुभवण्याची आणि गुरु-शिष्य परंपरेचा वारसा जाणून घेण्याची ही दुर्मिळ संधी असल्याने दशावतारप्रेमी, नवोदित कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.