क्रेडिट कार्डचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याची दिड लाखांची ऑनलाईन फसवणूक; कासार कोळवण येथील घटना

Crime

देवरूख (प्रतिनिधी):

फेसबुकवर जाहिरात पाहून क्रेडिट कार्ड मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ५३ हजार ४५९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील कासारवाडीतील निवृत्त कर्मचारी विलास नारायण कोळपे यांची ही आँनलाईन फसवणूक झाली असून देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​
​कासारकोळवण येथील ७६ वर्षीय तक्रारदार विलास कोळपे हे आपल्या मोबाईलवर फेसबुक अँप पाहत होते. त्यावेळी त्यांना ‘बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड योजना’ अशी एक जाहिरात दिसली. त्यांनी त्या जाहिरातीखालील ‘साइनअप’ टॅबवर क्लिक केले. ​त्यानंतर लगेचच एका अज्ञात इसमाने त्यांच्या व्हॉट्सअँपवर कॉल केला आणि “मी महाराष्ट्र बँकेतून बोलत आहे,” असे सांगत संवाद साधला. त्याने जाळ्यात ओढत कोळपे यांच्याकडून त्यांच्या डेबिट कार्डचा १६ अंकी नंबर मिळवला.

​डेबिट कार्डचा नंबर घेतल्यानंतर भामट्याने तो कॉल व्हॉट्सअँप व्हिडिओ कॉलमध्ये ट्रान्सफर केला. कोळपे यांचा चेहरा स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने मोबाईल धरण्यास सांगून आरोपीने तंत्रज्ञानाचा गैरवापर केला आणि क्षणातच त्यांच्या पेन्शन खात्यातून ऑनलाईनद्वारे १,५३,४५९ रुपये लांबवले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विलास कोळपे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(क) व ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील अधिक तपास करत आहेत. बँक अधिकारी कधीही फोनवरून डेबिट/क्रेडिट कार्डचे नंबर, ओटीपी किंवा बँक खात्याची वैयक्तिक माहिती मागत नाहीत. सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवू नका आणि आपली कोणतीही गोपनीय माहिती शेअर करू नका, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.