सावंतवाडीतील ऐतिहासिक आत्मेश्वर मंदिरावर जुने आंब्याचे झाड कोसळले 

छताचे अन् लगतच्या चारचाकीचे नुकसान; जीवितहानी टळली

सावंतवाडी । प्रतिनिधी :येथील ऐतिहासिक आत्मेश्वर मंदिर आवारात असलेले एक जुने व भलेमोठे आंब्याचे झाड अचानक उन्मळून पडले. हे झाड थेट मंदिराचे छत आणि जवळच उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनावर कोसळले. या घटनेत मंदिराचे आणि वाहनाचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कौल-पत्रे फुटले, वाहनाचा चक्काचूर

आत्मेश्वर मंदिराच्या आवारात हे जुने आंब्याचे झाड अनेक वर्षांपासून होते. बुधवारी अचानक प्रचंड आवाजासह हे झाड कोसळले. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. झाड कोसळल्यामुळे मंदिराच्या छताचे कौल आणि पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे. तसेच झाडाखाली उभ्या असलेल्या चारचाकी गाडीवर फांद्या पडल्याने गाडीचेही बरेच नुकसान झाले.

झाड कोसळले त्या वेळी मंदिर परिसरात भाविकांची किंवा स्थानिकांची नेहमीसारखी गर्दी नव्हती. परिसरातील वर्दळ कमी असल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनावर व मंदिराच्या परिसरात पसरलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या कुऱ्हाड आणि कटरच्या साहाय्याने हटवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. प्रशासन आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे परिसरातील रस्ता व परिसर मोकळा करण्याचे काम वेगाने पूर्ण केले जात आहे.