पिक विमा योजनेत ३१ जुलै पूर्वी नोंदणी करा : शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय

वेंगुर्ले : प्रतिनिधी

अलनिनो या प्रादुर्भावामुळे चालू वर्षी खरीप हंगामातील उत्पन्न कमी येण्याची दाट शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांचे नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, वादळ आदी संकटांपासून संरक्षण मिळावे यासाठी शासनाच्या पिक विमा योजना २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आणि हा विमा वेळेत भरावा असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय यांनी केले आहे.

यंदाच्या पिक विमा योजनेची नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून, शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी आजच पिक विमा भरून आपल्या पिकांचे संरक्षण करावे, असेही त्यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याने प्रत्येक पात्र शेतकऱ्याने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच, पिक विमा नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या अधिकृत प्रतिनिधी, सेवा केंद्र किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करावा, असेही श्यामसुंदर राय यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.