खांबाळे-मोहितेवाडीतील कोसळलेल्या लोखंडी साकवाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

वैभववाडी l प्रतिनिधी :      अतिवृष्टीमुळे खांबाळे-मोहितेवाडी येथील ओढ्यावरील लोखंडी साकव कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. जोशी यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, कनिष्ठ अभियंता श्री. दुडये आदी उपस्थित होते.

साकव कोसळल्याची माहिती पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी तात्काळ पालकमंत्री नितेश राणे यांना दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान, मौजे मोहितेवाडी येथील संजय गोविंद पवार हे स्वतःच्या मालकीची सहा गुरे चराईसाठी घेऊन ओढ्यावरील लोखंडी साकवावरून जात असताना साकव अचानक कोसळला. त्यामुळे सर्व गुरे साकवावर अडकून पडली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ मदतकार्य करून गुरांची सुरक्षित सुटका केली. या घटनेत चार गुरांना दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.