सावंतवाडी पोलिसांची धडक कारवाई
मुद्देमालासह एक ताब्यात
सावंतवाडी :सावंतवाडी शहरात माऊली जनरल स्टोअर व मिलग्रीस चर्चच्या बाजूला सावंतवाडी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत दोन वेगवेगळ्या टीव्हीएस ज्युपीटर वाहनांच्या डिकीतून बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी आणणाऱ्या एकास ताब्यात घेण्यात आले आहे. श्रीकांत चंद्रकांत आजगावकर (वय ५७, रा. सावंतवाडी, सालईवाडा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव असून, या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव प्रकाश भुजबळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. दिनांक २७ ऑक्टोबर रोजी रात्री २१.२० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी येथील माऊली जनरल स्टोअर व मिलग्रीस चर्चच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. आरोपी श्रीकांत आजगावकर हा आपल्या ताब्यातील दोन टीव्हीएस ज्युपीटर वाहनांच्या डिकीमध्ये गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बाळगून विक्री करीत असताना पोलिसांना रंगेहात मिळून आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीची दोन वाहने आणि वाहनांच्या डिकीतून वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिलबंद दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. यामध्ये डीएसबी ब्लॅक डिलक्स, ओकस्मिथ, रॉयल स्टॅग, बुलेट ७७, गोल्डन एस ब्लू, कमांडर ट्रिपल एक्स, ओल्ड मंक रम, मॅजिक मॉमेंट्स व्होडका, मॅकडॉवेल नंबर वन, ब्लेंडर्स प्राईड, सिग्नेचर, रोमानोव्ह व्होडका आणि रॉयल चॉइस कोकोनट फेनी अशा विविध प्रकारच्या गोवा बनावटीच्या दारूचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७५ हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची टीव्हीएस ज्युपीटर (क्र. MH-07-AV-9515) आणि ७५ हजार रुपये किमतीची इतर रंगाची टीव्हीएस ज्युपीटर (क्र. MH-07-AW-1201) अशी दोन वाहने आणि डिकीतून जप्त केलेली दारू असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घटनास्थळी सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हिंगे, पीएसआय अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल शिंदे, राऊळ आणि पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ आदींच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करीत असून, आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNNS) कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. सावंतवाडी शहरात या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.













