मसुरे | झुंजार पेडणेकर : पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाफेखोल तोरसोळे येथे पंचायत समिती मालवण यांच्या सौजन्याने ‘सीडबॉल’ (Seed Ball) उपक्रम मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.
झाडांची संख्या वाढवणे आणि निसर्गाचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. याच भावनेतून या उपक्रमांतर्गत आंबा, फणस, जांभूळ झाडांच्या बिया माती आणि शेणखतात व्यवस्थित मिसळून त्यांचे गोळे (सीडबॉल्स) तयार करण्यात आले. हे तयार केलेले सीडबॉल्स परिसरातील मोकळ्या जागेत फेकून निसर्गाच्या सानिध्यात रुजण्यासाठी सोडण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसांत हे बियांचे गोळे मातीत मिसळून त्यातून नवीन रोपे रुजण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि लहान वयापासूनच झाडांचे महत्त्व कळावे, या दृष्टीने या प्रत्यक्ष कृतीतून दिलेल्या धड्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रमुख उपस्थिती:
या स्तुत्य उपक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. दिपाली दिपक पताने यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच श्री. मिलिंद जाधव, श्री. दिपक पताने, श्री. सुरेश कदम, सौ. सुप्रिया हडकर, श्री. संकेत हडकर, सौ. श्रद्धा जाधव, श्री. दशरथ बांदल, सौ. दर्शना बांदल, श्री. प्रथमेश परब, सौ. स्मिता शिंदे, सौ. सीमा जाधव आणि सौ. आनंदी खांदारे या सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मनिषा ठाकर व उपशिक्षक श्री. सुयोग धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले व मार्गदर्शन केले. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











