रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद; तीन आरोपी अटकेत, १०० टक्के मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : रस्ता विचारण्याचा बहाणा करून नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणातील फिर्यादी आशिष कृष्णा जाधव यांना २१ मे २०२६ रोजी सायंकाळी पवारवाडी फाटा येथे चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात शिरगाव येथील दत्त मंदिरासमोर हर्या रोहित शिंदे यांचाही याच पद्धतीने मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाले होते. या घटनेनंतर अलोरे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली अलोरे पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २२ जुलै २०२६ रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे कारवाई करून विश्वनाथ अमर शिंदे (वय २३), प्रथमेश मलिक मोरे (वय २०) आणि अक्षय संभाजी जाधव (वय २३) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल आणि गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल अलोरे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) नितीन ढेरे यांच्या सूचनेनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले तसेच विजय आंबेकर, दिपराज पाटील, योगेश नावेकर आणि अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.