#
वरळीतील निवासस्थानातून सोन्याचे बिस्किट, हिऱ्यांचे दागिने आणि रोकड लंपास
प्रवीण सोलंकीला अटक; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
शिवसेना नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळीतील निवासस्थानातून तब्बल 2.65 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी घरातील एका जुन्या नोकराला अटक केली आहे. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोकड यांचा समावेश आहे. विश्वासू व्यक्तीनेच हा प्रकार केल्याचा पोलिसांना संशय असून तपास सुरू आहे. आरोपीने चोरीचा माल विकल्याची माहिती चौकशीत समोर आल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : शिवसेना खासदार आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या वरळी येथील निवासस्थानातून सुमारे 2.65 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई करत एका संशयिताला अटक केली असून त्याला फोर्ट येथील मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विश्वासू नोकरावर चोरीचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, घरातील विश्वासू नोकरानेच चोरी केल्याचा संशय आहे. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये 100 सोन्याची बिस्किटे, हिऱ्यांचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. घरातील काही कर्मचाऱ्यांवर या प्रकरणात संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
प्रवीण सोलंकीला अटक
या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण रमेश सोलंकी याला अटक केली आहे. तो गेल्या 24 वर्षांपासून सचिन अहिर यांच्या घरात काम करत होता. चौकशीत त्याने चोरीचा माल विकल्याची आणि काही साथीदारांच्या मदतीने हा प्रकार केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
कुटुंबीयांच्या लक्षात आली संशयास्पद बाब
16 जुलै 2026 रोजी हे प्रकरण उघडकीस आले. कुटुंबातील एका सदस्याच्या लक्षात आले की काही कर्मचाऱ्यांचे उत्पन्न कमी असतानाही त्यांनी झारखंडमध्ये नवीन घर, वाहन आणि इतर वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यानंतर चौकशी केल्यानंतर चोरीचा प्रकार समोर आला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तपास करत आहे.
सीसीटीव्हीमध्येही करण्यात आली होती छेडछाड
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही गडबड आढळून आली आहे. चोरी करण्यापूर्वी किंवा चोरीनंतर सीसीटीव्हीमध्ये फेरफार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. चोरीच्या वस्तूंमध्ये 15 लाख रुपये किमतीचे सोन्याचे बिस्किट, 45 लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आणि सुमारे 50 लाख रुपयांची हिऱ्यांची बांगडी यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपीच्या वकिलांचा दावा
दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांचे आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांकडून चोरीतील इतर आरोपी, चोरीचा माल आणि या प्रकरणातील संपूर्ण कटाचा तपास सुरू आहे.










