#
गणपत भिसे यांच्या घरासमोर मध्यरात्री हल्ला; परिसरात भीतीचे वातावरण
सीसीटीव्हीत घटना कैद; पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू
परभणी शहरातील रामनगर परिसरात अनुसूचित जाती उपवर्गीकरण चळवळीचे कार्यकर्ते गणपत भिसे यांच्या घरासमोर उभी असलेल्या कारची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कुटुंबीयांनी सुरक्षेची मागणी केली आहे. या हल्ल्यात कारचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
परभणी : शहरातील रामनगर परिसरात रविवारी मध्यरात्री गणपत भिसे यांच्या घरासमोर उभी असलेल्या कारवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून मोठी तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यरात्री घराबाहेर गोंधळ
रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास भिसे कुटुंबीय जेवण करून घरी विश्रांती घेत होते. त्यानंतर रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आरडाओरडा आणि शिवीगाळ सुरू झाल्याने कुटुंबीय जागे झाले. बाहेर येण्याचा प्रयत्न होत असताना अज्ञात व्यक्तींनी घरासमोर उभी असलेल्या कारची तोडफोड करून घटनास्थळावरून पळ काढला.
एक लाखांचे नुकसान, धमकीचाही आरोप
या हल्ल्यात कारचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच हल्लेखोरांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेमागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू असून विविध शक्यतांचा शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार घटनास्थळी आल्याचे दिसते. त्यानंतर दोन व्यक्ती जड वस्तूने कारच्या काचा फोडताना दिसत आहेत. आरोपींपैकी एकाने टी-शर्ट घातलेला असल्याचेही फुटेजमध्ये दिसून येते. नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.










