#
साई समाधी गेट क्रमांक चारजवळ धक्कादायक घटना; दोन महिलांना अटक
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कठोर निर्देश; फुटपाथवरील विक्रेत्यांवर कारवाई
शिर्डीतील साई मंदिर परिसरात फळ विक्रेत्या महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. साई समाधी गेट क्रमांक चारजवळ सकाळच्या वेळी ही घटना घडली. किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर या 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. घटनेनंतर प्रशासनाने शिर्डीतील सुरक्षेबाबत आणि फुटपाथवरील विक्रेत्यांबाबत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
शिर्डी : साई मंदिर परिसरातील समाधी गेट क्रमांक चारजवळ फळ विक्रेत्या महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या हल्ल्यात जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय 30) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मंदिर परिसरासारख्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
किरकोळ वादातून हत्येचा संशय
प्राथमिक माहितीनुसार, किरकोळ वादातून हा चाकू हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. वाद वाढल्यानंतर आरोपी महिलांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्यात जयश्री क्षीरसागर यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी फिजा पटेल (वय 21) आणि तिची साथीदार अंजली खांडीझोड (वय 22) या दोघींना अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
शिर्डीतील फुटपाथ विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश
या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फुटपाथवरील विक्रेत्यांवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच विक्रेत्यांनी आणि दुकानधारकांनी किती वेळ व्यवसाय करायचा, याबाबत स्थानिक प्रशासनाने नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
शिर्डीचे पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले की, 19 तारखेला सकाळी 9.30 वाजता साई समाधी गेट क्रमांक चार परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपी नशेच्या अवस्थेत होत्या का, याचीही माहिती घेतली जात आहे.










