सोलापुरातील बसवरुढ महास्वामी मठाला धमकी; ‘मंदिर उडवू’ अशी चिठ्ठी टाकणाऱ्या महिलेला अटक

# मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंच्या मठात धमकीची चिठ्ठी; सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई

संशयित महिलेला न्यायालयाने सुनावली एक दिवसाची पोलिस कोठडी

सोलापुरातील श्री श्री सद्गुरु बसवरुढ महास्वामी मठाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मठाच्या परिसरात ‘मंदिर हम उडाले’ असा मजकूर असलेली चिठ्ठी आढळून आली. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका महिलेला ताब्यात घेतले आहे. मठाला धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हा मठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरूंच्या नावाने प्रसिद्ध असल्याने या घटनेची मोठी चर्चा होत आहे.


सोलापूर : शहरातील कस्तुरबा नगर परिसरातील श्री श्री सद्गुरु बसवरुढ महास्वामी मठाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात व्यक्तीने मठाच्या बाजूला दोन पानी चिठ्ठी टाकली होती. या चिठ्ठीत ‘मंदिर हम उडाले’ असा उल्लेख करण्यात आला होता.

52 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या मठाला अशा प्रकारची धमकी मिळाल्याने मठ प्रशासन आणि भाविकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या घटनेनंतर मठाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित महिलेवर कारवाई

मठाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एका महिलेवर संशय आला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतले.

पोलिसांनी संशयित महिलेला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या महिलेचे नाव मेनिसा लाडलेब शेख असल्याची माहिती समोर आली आहे.

मानसिक विकृतीतून कृत्य केल्याचा पोलिसांचा संशय

प्राथमिक तपासानुसार, संबंधित महिलेने मानसिक विकृतीतून हे कृत्य केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र धमकीमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

मठातील व्यक्तींना चिठ्ठी आढळल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. सध्या मठ परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.