महाराष्ट्राच्या अन्नदात्या बळीराजाला सुखसमृद्धी लाभो : ना. देवेंद्र फडणवीस

 

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शासकीय महापूजा!

विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीच्या रंगात रंगली अवघी पंढरी

सचिन रेडकर । पंढरपूर : ‘जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ‘ रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा विठ्ठल नामाचा गजर आणि भक्तीच्या रंगात अवघी पंढरी आज दुमदुमून गेली आहे. देवशयनी आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात भक्तीचा महासागर उसळला असून चंद्रभागेच्या तिरी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त मध्यरात्री राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत विठ्ठल- रखुमाईची शासकीय महापूजा पार पडली. महाराष्ट्राच्या अन्नदात्या बळीराजाच्या सुख, समृद्धी आणि संकटमुक्त जीवनासाठी विठ्ठल चरणी मुख्यमंत्र्यांनी साकडे घातले.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असणारे माने दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले.

*आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शासकीय महापूजा!*
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मानाचे वारकरी व माने दांपत्य यांच्यासोबत आज पंढरपुरात केली. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची संपूर्णपणे शोडशोपचारासह महापूजा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस खास डिझायनर पोशाख देखील अर्पण केला होता.

*नव्या भक्त निवासाचे भूमीपुजन!*
पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिराच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. विठ्ठलाची शासकीय पूजा झाल्यानंतर आळंदी देवस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन भक्तनिवास उभा केले जात आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिरा सोबतच नवे भक्तनिवास लवकरच उभारले जाणार आहे.