प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर :जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे मुलगी जन्मल्याचा राग आणि पतसंस्थेतून २० लाख रुपयांचे कर्ज काढून न दिल्यामुळे एका शिक्षिकेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना जुलै २०२६ मध्ये समोर आली आहे. याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या तक्रारीवरून तिचे पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिक्षिका सौ. प्रणिता विनायक परीट (वय ३३) यांनी कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली
आहे. याप्रकरणी पती विनायक बापूसो परीट (३३), सासू संगीता बापूसो परीट (५०) आणि सासरे बापूसो अण्णाप्पा परीट (६०, सर्व रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित शिक्षिकेवर ५ जून २०२१ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत मजरेवाडी येथील राहत्या घरी सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. फिर्यादीला पहिली व दुसरी मुलगी झाल्याचा राग मनात धरून पती, सासू व सासऱ्यांनी वारंवार वाद घालून मानसिक त्रास दिला. २० लाख रुपये कर्जाची मागणी पूर्ण न केल्याने माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी तगादा लावत मुलाचा दुसरा विवाह करण्यासाठी अखेर घराबाहेर हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.










