स्वप्निल कदम-कुडाळ : मराठी शाळा टिकल्या नाहीत, तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांपैकी काहीही वाचणार नाही. त्यामुळे जातिधर्मभेद विसरून मराठी शाळांच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी केले.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित महाराष्ट्रधर्म शिबिरात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मराठीप्रेमी मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील मराठी शाळांचा प्रश्न आणि वाढते स्थलांतर याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. महाराष्ट्र टिकवायचा असेल तर कोकण टिकवणे आवश्यक आहे. हिंदू-मुस्लिम या छद्म संघर्षातून बाहेर पडून महाराष्ट्रधर्मासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही डॉ. पवार यांनी केले.
शिबिरातील दुसरे वक्ते तथा भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब यांनी ‘भाषा आणि धर्म’ यांच्या सामाजिक भूमिकांवर भाष्य केले. धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारत भाषानिरपेक्ष नाही. भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाल्याने धर्मापेक्षा भाषा ही आपली प्राथमिक ओळख आहे. श्रद्धा हा धर्माचा आधार, तर ज्ञान हा भाषेचा आधार आहे. समाजाच्या प्रगतीसाठी धर्मसंस्थांपेक्षा भाषा व ज्ञानवृद्धी करणाऱ्या संस्था अधिक सक्षम होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
कोकणाला बाळशास्त्री जांभेकरांसारख्या विचारवंतांची अभिमानास्पद परंपरा लाभली असतानाही धार्मिकतेचे अवडंबर आणि मातृभाषेतील शिक्षणाची उपेक्षा यामुळे कोकण बौद्धिक क्षेत्रात मागे पडत असल्याची खंत डॉ. परब यांनी व्यक्त केली. शिबिराच्या उत्तरार्धात झालेल्या चर्चेत उपस्थित मान्यवरांनी प्रश्न विचारून व मनोगत व्यक्त करून सहभाग घेतला. यावेळी मराठीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना गोरे यांनी केले.












