निरवडे ग्रामपंचायतीत जुन्या वादातून दोन गटांत मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल

सावंतवाडी : निरवडे ग्रामपंचायत कार्यालयात पूर्ववैमनस्य आणि जुन्या वादातून दोन व्यक्तींमध्ये भर कार्यालयातच मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोघांवरही गुन्हे नोंदवले आहेत.

सुहास शंकर गावडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी नागेश सुरेश गावडे यांच्याकडे कामाच्या टेंडरसाठी दिलेल्या पैशांची विचारणा केली. याचा राग आल्याने नागेश यांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.

दुसऱ्या बाजूने, नागेश सुरेश गावडे यांनी तक्रार दिली आहे की, ग्रामपंचायतीची कामे आणि माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागितलेल्या माहितीच्या रागातून सरपंचपती सुहास गावडे यांनी त्यांना धमकी दिली. तसेच कामाच्या पैशांच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली.

सावंतवाडी पोलिसांनी सुहास गावडे आणि नागेश गावडे या दोघांवरही परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.