सावंतवाडी : माजगाव – चिपटेवाडी – वेत्ये रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण व्हावे, यासाठी माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
सादर केलेल्या निवेदनात रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी तीव्र उतार कमी करणे, डांबरीकरण करणे, धोकादायक वळणांचे सुधारित बांधकाम करणे तसेच साईडपट्टीची कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उर्वरित कामासाठी शासन स्तरावर प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी बाबू सावंत यांचे स्वागत करत, “बाबू सावंत आमचे जुने कार्यकर्ते आहेत,” असे सांगितले. तसेच या रस्त्याच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असलेली वन (फॉरेस्ट) विभागाची परवानगी लवकरात लवकर मिळावी, अशीही विनंती बाबू सावंत यांनी त्यांच्याकडे केली. त्यावर संबंधित विभागाशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करून रस्त्याचे उर्वरित काम लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री राणे यांनी दिले.
या भेटीमुळे माजगाव – चिपटेवाडी – वेत्ये मार्गाचे रखडलेले काम पूर्ण होण्याबाबत ग्रामस्थांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.











