प्रतिनिधी/ रोहन कांबळे
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष करून या आरोपींनी चैन स्नॅचिंगचे सूत्र सुरू ठेवले होते. ज्यामुळे महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याच्या पद्धतीचे सखोल विश्लेषण करून तपासाला सुरुवात केली.
या तपासादरम्यान हे गुन्हे रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार वैभव नारायण आडोळे (वय.२६,मूळ रा.येरला, ता.मोर्शी, जि.अमरावती, सध्या रा.हिंजवडी, पुणे)त्याच्याकडून होत असल्याचे निष्पन्न झाले.वैभव आढळे याच्यावर २०१५ ते ३०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात ६० पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपी मोबाईलचा वापर करत असल्याने त्याचा शोध घेणे आव्हानात्मक बनले होते.मात्र पथकांनी पुण्यातील त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी १० दिवस पाळत ठेवून त्याला त्याचा साथीदार करण गोरख जगधने (वय १९, रा.पैठ,जि.छत्रपती संभाजीनगर,सध्या रा.औंध, पुणे शिरवळ, जि.सातारा)परिसरातून ताब्यात घेतले.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.












