तालुक्यातील इतरही रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले*
*देवरूख (प्रतिनिधी)*
गोरगरीबांच्या रेशनच्या धान्यातील काळाबाजार रोखणाऱ्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या दणक्यामुळे आणि त्याने उघड केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे अखेर एका बड्या वरिष्ठ अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कनिष्ठ अधिकाऱ्याने धाडस दाखवून थेट खात्याच्या मंत्र्यांपर्यंत तक्रारीचा पाढा वाचत नार्को व पॉलीग्राफ चाचणीचे आव्हान दिल्यानंतर महसूल अन् पुरवठा विभागात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रामाणिक पुरवठा अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील हप्तेवसुली, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संशयास्पद वर्तन आणि रेशन दुकानांमधील धान्याची अफरातफर चव्हाट्यावर आणली होती. या उघड झालेल्या घोटाळ्यांमुळे निर्माण झालेल्या प्रशासकीय पेचप्रसंगानंतर वरिष्ठांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘त्या’ ५ वादग्रस्त रेशन दुकानांचे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रामाणिक अधिकाऱ्याने केलेल्या धडक तपासणीत या पाचही दुकानांमध्ये धान्याची अवाढव्य तूट आढळली होती आणि गोरगरीबांच्या धान्याचा काळाबाजार झाल्याचा थेट अहवाल सादर करण्यात आला होता. पूर्वी वरिष्ठांकडून या कारवाईच्या प्रस्तावावर ‘लाडीगोडी’ करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला होता.
आता या प्रकरणात मोठी उलथापालथ झाल्यामुळे
कारवाईला वेग मिळणार का? तात्काळ स्थगित राहिलेली कारवाई आता सुरु होऊन ‘त्या’ ५ दुकानांचे परवाने रद्द होणार का? धान्याची तूट वसूल होणार का? गोरगरीबांच्या लाभाचे गायब केलेले धान्य आणि झालेल्या अपहाराची वसुली दुकानदारांकडून केली जाणार का? असे सवाल उपस्थित होत आहेत. तर या धडक कारवाईमुळे तालुक्यातील इतर नियमबाह्य कामे करणाऱ्या रेशन दुकानदारांचेही धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीनंतर आता या ५ रेशन दुकानदारांवरील कारवाईची टांगती तलवार अधिकच तीव्र झाली असून, नवीन अधिकारी या प्रकरणात काय कडक भूमिका घेतात, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे डोळे लागले आहेत.













