अनैतिक संबंधातून माजी सरपंच महिलेचा निर्घुण खून…

नातेवाईकांच्या चपळतेमुळे खुनाचा उलघडा…

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील शिरगाव येथील अनैतिक संबंधातून एका विधवा सरपंच महिलेची गळा दाबून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी भिवंडीत घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरेखा शिवाजी न्यारे (वय ४० रा. शिरगाव ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर)असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार,मृत सुरेखा शिवाजी न्यारे या शाहुवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या. त्यांची प्रियकर प्रकाश आनंदा पाटील याने गावातच गळा आवळून हत्या केली. प्रेमसंबंधांमधून सुरेखा न्यारे या लग्नासाठी दबाव आणत होत्या. तसेच धमकावत होत्या. त्यातूनच आपण त्यांची हत्या केल्याची कबुली आरोपी प्रकाश पाटील याने पोलिसांनी केलेल्या चौकशीत दिली आहे.

मृत सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश पाटीच यांची शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर घरे आहेत. तसेच जवळजवळ घरं असल्याने दोन्ही कुटुंबांची कौटुंबिक जवळीक होती. दरम्यान, आरोपीने सुरेखा यांना पंढरपूरच्या वारीसाठी जाऊ असे सांगून गावाबाहेरील शेतात नेले. तिथे एका जनावरांच्या गोठ्यात नेऊन त्यांचा गळा आवळून खून केला.
सुरेखा न्यारे यांचा गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी प्रकाश याने पुरावे नष्ट करण्याची योजना आखली. त्यासाठी त्याने सुरेखा यांचा मृतदेह लांब मुंबईत नेऊन समुद्रात टाकण्याचे ठरवले. त्यासाठी आरोपीने मृतहेदासह भिवंडीमधील कशेळी गाव गाठले. तिथून मदतीसाठी त्याने भाच्याला फोन केला. मात्र भाच्याने त्याला मदत न करता पोलिसांना फोन केला आणि आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.