चिपळूण (प्रतिनिधी) : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. विद्यार्थी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन माननीय प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यार्थी परिषद समन्वयक डॉ. नामदेव डोंगरे यांनी केले.
यावेळी एफ.वाय. बी. व एफ. वाय. बी. कॉम.मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्यांनी स्वागत केले. विद्यार्थी परिषदेच्या वतीने माननीय प्राचार्य, प्राध्यापक यांचा गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचेही यावेळेस स्वागत करण्यात आले. प्राध्यापक डॉ. सुरेश सुतार आणि स. प्राध्यापक प्रियंका गोयथळे यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थिनींनी आम्ही चालवू हा पुढे वारसा हे गीत सादर केले. प्राचार्य डॉ.बाळासाहेब यादव यांनी आई-वडील हे आपले प्रथम गुरु असून विद्यार्थ्यांनी योग्य आहार, विचार, वाणी ,वर्तन याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे हे सांगितले. मानवी जीवनात गुरूंचे महत्त्व अनन्यसाधारण असून प्रत्येकाने गुरुप्रती आदर बाळगण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया कदम हिने तर आभार सहाय्यक प्राध्यापक शाहरुख चोगले यांनी मानले.











