संगमेश्वर पंचायत समितीचा कारभार वाऱ्यावर; गटविकास अधिकारी रजेवर; जि. प. प्रशासनाला डुलकी

स्वाक्षरीअभावी फायली अडकल्या, विकासकामे लटकली; आठवडा उलटला तरी पदभाराचा पत्ता नाही

देवरूख (प्रतिनिधी):

संगमेश्वर पंचायत समितीचा कारभार सध्या पूर्णपणे वाऱ्यावर पडला असून शासकीय ढिसाळपणाचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे हे २२ जूनपासून दीर्घ रजेवर गेले आहेत. रजेवर जाऊन तब्बल सात दिवस उलटले, तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने अद्याप या पदाचा अधिकृत पदभार कोणाकडेच सोपवलेला नाही. त्यामुळे महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या न झाल्याने तालुक्यातील अनेक विकासकामे आणि नागरिकांची वैयक्तिक कामे ठप्प झाली आहेत.

​पंचायत समितीमध्ये सध्या सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच श्रेणी-१ दर्जाचे सक्षम अधिकारी उपलब्ध आहेत. असे असतानाही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदभार देण्याबाबत दाखवलेली उदासीनता थक्क करणारी आहे. “अधिकारी हजर, पण अधिकार गायब!” अशीच काहीशी अवस्था सध्या संगमेश्वर पंचायत समितीत पाहायला मिळत आहे. वरिष्ठांनी कोणाकडेही पदभार सोपवला नसल्यामुळे प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले असून, यामागे काही राजकीय दबाव किंवा अंतर्गत साठमारी आहे का? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे. गटविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी अत्यंत महत्त्वाची असते.

दाखले, शासकीय योजनांचे हप्ते, विकासकामांचे प्रस्ताव आणि प्रशासकीय मंजुरी यांसारख्या अनेक कामांसाठी नागरिक दूरवरच्या ग्रामीण भागातून देवरुख येथील पंचायत समितीत चक्रा मारत आहेत. मात्र, साहेब रजेवर आणि पदभार कोणाकडेच नाही, हे उत्तर ऐकून नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदार आणि मनमानी कारभारामुळे संगमेश्वर तालुक्यातील जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने तात्काळ कोणाकडे तरी प्रभारी पदभार सोपवून अडकलेली कामे मार्गी लावावीत, अन्यथा या भोंगळ कारभाराविरोधात आक्रमक पाऊल उचलावे लागेल, असा इशारा स्थानिक नागरिकांमधून दिला जात आहे.