९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्याने बंदूक निर्मिती प्रकरणातील मुख्य आरोपीला डिफॉल्ट जामीन

ॲड. विनय विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद; न्यायालयाचा आरोपी जगन्नाथ मेस्त्री यांना दिलासा

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे-सुतारवाडी येथे कथित बेकायदेशीर बंदुका व अग्निबाण निर्मिती केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले मुख्य संशयित आरोपी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५, रा. सुतारवाडी, निरुखे, ता. कुडाळ) यांना न्यायालयाने डिफॉल्ट जामीन मंजूर केला आहे. अटकेनंतर ९० दिवसांची कायदेशीर मुदत उलटूनही पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल न झाल्याने बचाव पक्षाने या कायदेशीर तरतुदीचा आधार घेत जामिनासाठी अर्ज केला होता.

 

या प्रकरणात संशयित आरोपीच्या वतीने विधीज्ञ ॲड. विनय विवेक मांडकुलकर यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाला ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. प्रणाली मोरे, ॲड. वृषांग जाधव व ॲड. सुयश गवंडे यांनी सहकार्य केले.

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विल्सन झुजे डिसोजा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री कुडाळ पोलिसांच्या पथकाने निरुखे येथील जगन्नाथ मेस्त्री यांच्या घरामागील शेडवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी बंदुका तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, विविध लांबीच्या कथित विनापरवाना बंदुका, बॅरल, ट्रिगर गार्ड, नळ्या तसेच इलेक्ट्रिक ड्रिल व ग्राइंडर मशीन असा सुमारे १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे सांगण्यात आले.

 

या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, ५ व २५ अन्वये गुन्हा दाखल करून जगन्नाथ मेस्त्री यांना अटक करण्यात आली होती.

 

अटकेनंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. कायद्यानुसार निर्धारित मुदतीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक असताना ९० दिवसांची मुदत संपूनही दोषारोपपत्र दाखल झाले नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. याच आधारावर आरोपीच्या वतीने डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज करण्यात आला.

 

बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जगन्नाथ मेस्त्री यांना डिफॉल्ट जामीन मंजूर केला. या निकालामुळे सदर प्रकरणात बचाव पक्षाच्या कायदेशीर युक्तिवादाला यश मिळाले आहे.