कुटगिरी येडगेवाडीतील पाच कुटुंबांचे पिण्याच्या पाण्यासाठी देवरूख पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण

पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाच्या गलथान आणि बेजबाबदारपणाविरोधात उपोषण सुरू

देवरूख (प्रतिनिधी):

​संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी येडगेवाडी येथे गेल्या पाच महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या प्रशासनाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभाराचा आरोप करत गुरूवारपासून कुटगिरी येडगेवाडी येथील पाच कुटुंबीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी देवरूख येथील पंचायत समिती समोर ‘बेमुदत आमरण उपोषण’ सुरू केले आहे.

​ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात व टंचाईच्या काळात पिण्याच्या पाण्याअभावी ग्रामस्थांचे हाल झाले होते. आता ही होत आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली.
​ उपोषकर्त्यांच्या प्रमुख मागण्या:
​१. ऐन कडाक्याच्या उन्हात आणि टंचाईच्या काळात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करणाऱ्या इसमांवर तातडीने फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.
२. शासकीय सार्वजनिक विहिरीमध्ये बेकायदेशीररीत्या टाकण्यात आलेले खाजगी पंप आणि वादग्रस्त पाईपलाईन काढून ती तातडीने जप्त करण्यात यावी.
३. ग्रामपंचायत राजीवली यांची रीतसर परवानगी घेऊन स्वखर्चाने करत असलेल्या खाजगी नळपाणी योजनेच्या दृष्टीने सकारात्मक व तात्काळ कारवाई करण्यात यावी.
​
​या बेमुदत आमरण उपोषणाला शंकर येडगे, रामचंद्र येडगे, गणपत येडगे, हरिचंद्र येडगे, गोविंद येडगे यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. या उपोषणाला भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, मनसेचे नेते जितेंद्र चव्हाण यांनी पाठींबा दर्शवला आहे.