रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीवर रोख लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. ३१ जुलै २०२६ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे आरवली बाजारपेठ येथे गस्त घालणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एका संशयित रिक्षातून (क्रमांक MH-08-E-8369) अवैध दारू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पथकाने रिक्षा थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता प्रवाशांच्या सीटवर आणि खाली देशी-विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी रिक्षाचालक सुभाष भिकाजी खसासे (वय ४७, रा. आरवली, जि. रत्नागिरी) आणि रिक्षातील प्रवासी प्रभाकर अंकुश पिलणकर (वय ५४, रा. आरवली, जि. रत्नागिरी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ९,५२० रुपये किमतीचे बिगरपरवाना देशी-विदेशी मद्य आणि ६५,००० रुपयांची रिक्षा असा एकूण ७४,५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार विवेक रसाळ, दीपराज पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.












