वडिलोपार्जित जमिनीच्या व्यवहारात बनावट मुखत्यारपत्राद्वारे फसवणुकीचा आरोप
पाच जणांविरुद्ध गुन्हा
कणकवली : वडिलोपार्जित सामाईक जमिनीचे सातबारा उतारे स्वतंत्र करून देण्याच्या नावाखाली कुलमुखत्यारपत्राचा कथित गैरवापर करून स्वतःच्या फायद्यासाठी जमिनीची नोंद करून घेतल्याचा तसेच बेपत्ता असलेल्या महिलेच्या नावाने कथित बनावट मुखत्यारपत्र तयार करून सामाईक जमिनीची विक्री केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम ४६७, ४६८, ४२०, ४१९, ४१८ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार करीत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद पंढरीनाथ राणे (वय ४०, रा. हळवल मधलीवाडी, ता. कणकवली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मौजे हळवल येथील सर्व्हे क्रमांक ४० (अ), हिस्सा क्रमांक ५७ ही वडिलोपार्जित सामाईक मिळकत पूर्वी त्यांचे दिवंगत आजोबा लक्ष्मण भिकाजी राणे, चुलत चुलते विद्याधर रामचंद्र राणे आणि दिवंगत चुलत आजोबा बाबाजी बाळा राणे यांच्या संयुक्त नावावर होती. या मिळकतीच्या वाटपासाठी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात रे.दि.मु. क्र. ३३/१९८८ असा दावा दाखल झाला होता. त्यानंतर तडजोड हुकूमनाम्यानुसार संबंधित सहहिस्सेदारांनी परस्पर समजुतीने जमिनीचे वाटप करून ताबा घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, तडजोडीनुसार सर्व्हे क्रमांक ४० (अ), हिस्सा क्रमांक ५७ मधील निम्मे क्षेत्र दिवंगत लक्ष्मण भिकाजी राणे यांच्या वाट्याला, तर उर्वरित निम्मे क्षेत्र दिवंगत बाबाजी बाळा राणे यांच्या वाट्याला आले होते. त्यानुसार सन १९९४ मध्ये फिर्यादीच्या वडिलांनी त्यांच्या वाट्याच्या जमिनीवर घर बांधले, तर उर्वरित जागा मोकळी ठेवण्यात आली होती.
मात्र, तडजोडीनंतरही सातबारा स्वतंत्र झाला नसल्याने वारंवार न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहण्याची गरज भासणार असल्याचे सांगून सातबारा स्वतंत्र करण्याचे काम आपणच पाहतो, असे सांगत विद्याधर रामचंद्र राणे यांनी स्वतःच्या नावे कुलमुखत्यारपत्र करून देण्यास सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. त्यानुसार दिनांक १३ सप्टेंबर २०१० रोजी कणकवली येथे नोटरीसमोर फिर्यादीसह प्रताप पंढरीनाथ राणे, गणेश पंढरीनाथ राणे, दीपक लक्ष्मण राणे, पुरुषोत्तम बाबाजी राणे व सुनील बाबाजी राणे यांनी कुलमुखत्यारपत्रावर स्वाक्षऱ्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर संबंधित कुलमुखत्यारपत्राचा वापर सातबारा स्वतंत्र करण्यापुरता न करता, तडजोड हुकूमनाम्याप्रमाणे सर्व सहहिस्सेदारांचे वाटप न करता स्वतःच्या फायद्याचे वाटप करून घेण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. महसूल विभागाकडून कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वडिलोपार्जित मिळकतीतील सर्व्हे क्रमांक ७५, हिस्सा क्रमांक ६, सर्व्हे क्रमांक ७५, हिस्सा क्रमांक ३३ आणि सर्व्हे क्रमांक ८६, हिस्सा क्रमांक १ या जमिनींची विक्री झाल्याचे सातबारा उताऱ्यांवरून समोर आले. त्यानंतर दिनांक ०६ जून २०२४ रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, कणकवली येथून संबंधित खरेदीखतांच्या प्रती प्राप्त करून घेतल्यानंतर कुलमुखत्यारपत्राचा कथित गैरवापर करून संबंधित जमिनी परस्पर स्वतःच्या नावे करून विक्री करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीने पुढे म्हटले आहे की, त्यांची आई सुहासिनी पंढरीनाथ राणे या दिनांक ०८ जून २००८ पासून बेपत्ता असून त्याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात नोंद आहे. त्या अद्याप सापडलेल्या नसतानाही त्यांच्या नावाने कथित बनावट मुखत्यारपत्र तयार करण्यात आले. त्यावर त्यांचा फोटो, कथित बनावट सही व अंगठ्याचा ठसा वापरून नोटरीसमोर ते प्रमाणित करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
फिर्यादीनुसार, दिनांक १३ सप्टेंबर २०१० ते ०६ जून २०२४ या कालावधीत मौजे हळवल, कणकवली व अंधेरी (मुंबई) येथे विद्याधर रामचंद्र राणे यांनी सहदेव भिकाजी राणे, अमित सहदेव राणे, नोटरी डी. आर. कुद्रीगी आणि ओळख घालणारे ॲड. एम.डी.एम. अहमद यांच्या संगनमताने कथित बनावट मुखत्यारपत्राचा वापर करून वडिलोपार्जित सामाईक जमिनीची विक्री केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या फिर्यादीवरून कणकवली पोलिसांनी विद्याधर रामचंद्र राणे, सहदेव भिकाजी राणे, अमित सहदेव राणे, नोटरी डी. आर. कुद्रीगी आणि ॲड. एम.डी.एम. अहमद यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता, १८६० मधील कलम ४६७, ४६८, ४२०, ४१९, ४१८ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार करीत आहेत.












