विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा- डॉ. श्याम जोशी

चिपळूण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे स्वतःशी स्पर्धा करणे, गृहपाठाचे योग्य नियोजन करणे, अभ्यासाचा आनंद घेणे, लेखन व आठवणींची सवय लावणे, कौशल्ये विकसित करणे, जीवनाचे ध्येय निश्चित करणे, निरोगी जीवनशैली स्वीकारणे, मोबाईलचा अनावश्यक वापर टाळणे, छंद जोपासणे, आत्मविश्वास वाढविणे हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन डीबीजे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. श्याम जोशी यांनी केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, शिस्त, नियमित अभ्यास आणि स्वावलंबन यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले. परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्याम जोशी उपस्थित होते. तसेच संस्थेचे सहकार्यवाह आणि गद्रे शाळेचे शाळा समिती अध्यक्ष विनोद फणसे, सदस्या सौ. प्राजक्ता ओक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, ग्रंथपूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थिनींनी गुरूंची महती सांगणारे गीत गायले. त्यानंतर विनोद फणसे यांच्या हस्ते प्रमुख वक्ते डॉ. श्याम जोशी यांचे स्वागत करण्यात आले. गद्रे कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. संगीता जोशी यांनी प्रमुख वक्ते डॉ. श्याम जोशी यांचा परिचय करून दिला.
प्रमुख वक्ते डॉ. श्याम जोशी यांचे विधायक शिक्षण या विषयावर अतिशय प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. संस्थेचे सहकार्यवाह विनोद फणसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ शिक्षिका सौ. संगीता जोशी यांनी शाळेला गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वतीची मूर्ती भेट म्हणून दिली त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे, पर्यवेक्षिका सौ. सविता कर्वे, कॉलेज विभागप्रमुख सौ. शैलजा देवरुखकर उपस्थित होते. कॉलेजच्या शिक्षिका सौ. रिमा लटके यांनी सर्वांचे आभार मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या सांस्कृतिक विभागप्रमुख सौ. संगीता जोशी, सौ. रिमा लटके, सौ. आरोही जाधव यांनी उत्तम नियोजन करून सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.