विभा अरविंद ग्रंथालयातर्फे डॉ. एस. आर. रंगनाथन यांना अभिवादन
चिपळूण (प्रतिनिधी) : भारतातील ग्रंथालय चळवळीचे जनक आणि ग्रंथालयशास्त्राचे अध्वर्यू डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त खेड-चिपळूण येथील विभा अरविंद ग्रंथालयात डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष बापूसाहेब काणे, संचालक सुहासराव चव्हाण, कोषाध्यक्ष विनायकराव ओक, डॉ. माधवराव सोमण, मेधा बेटकर, सुप्रिया खोत, पूर्वा कांबळे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रंथालय दिनाचे औचित्य साधून परांजपे मोतिवाले स्कूलमधील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालवाचक सभासद नोंदणी उपक्रम राबविण्यात आला. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक तथा ग्रंथालयाचे संचालक सुहासराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात तब्बल ६८ विद्यार्थ्यांनी बालवाचक सभासदत्व स्वीकारले. यावेळी मल्लेश लकेश्री, विखारे, मुख्याध्यापक शिवाजी शिंदे, शिक्षिका टाकळे तसेच शाळेतील अन्य शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रंथालय सभासदत्व शुल्क श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त डॉ. यतिन जाधव यांनी स्वतःच्या वतीने ग्रंथालयाकडे सुपूर्द केले. विद्यार्थ्यांच्या वाचनविकासासाठी केलेल्या या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने डॉ. जाधव यांचे आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण व्हावी, अवांतर वाचनाची सवय लागावी आणि त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सभासदत्वामुळे विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याची संधी मिळणार आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला शास्त्रीय आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथालयांनी विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांशी जोडणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले. ‘वाचाल तर वाचाल’ या विचाराला कृतीची जोड देत ६८ विद्यार्थ्यांना ग्रंथालयाशी जोडणारा हा उपक्रम वाचन संस्कृती वृद्धिंगत करणारा ठरला.













