कै. उत्तम वाडकर यांना सावंतवाडीत शोकसभेतून भावपूर्ण श्रद्धांजली
सावंतवाडी :
नेहमीच प्रसंगाला धावून जाणारे आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे उत्तम वाडकर यांच्या रूपाने एका सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत सावंतवाडीतील शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत कै. उत्तम वाडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे पत्रकार आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेस माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ शिवसैनिक भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, रुपेश राऊळ, समीर वंजारी, सुधीर पराडकर, संदीप टोपले, रमेश गावकर, सुरेश भोगटे, रमेश बोंद्रे, सीमा मठकर, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, उदय पारिपत्ये, राम वाडकर, विलास जाधव, महेश पांचाळ, रेमी आल्मेडा, प्रमोद सावंत, रश्मी माळवदे, शितोळे, निशांत तोरसकर, राकेश परब, ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक, अभिमन्यू लोंढे, राजू तावडे, हरिश्चंद्र पवार, विजय देसाई, अनंत जाधव, सचिन रेडकर, रुपेश हिराप, प्रा. रुपेश पाटील, विनायक गावस, शैलेश मयेकर, प्रसाद माधव, संदेश पाटील, निखिल माळकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, उत्तम वाडकर हे सर्व क्षेत्रांत पारंगत व्यक्तिमत्त्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अतूट प्रेमापोटी त्यांनी सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात शिवसेना पक्षविस्ताराचे मोलाचे कार्य केले. गावागावांत जाऊन त्यांनी कडवट शिवसैनिक घडवले आणि नेहमीच अन्यायाविरोधात वाचा फोडत शिवसैनिकांचे मनोबल उंचावले. एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी पुढाकार घ्यायचे, त्यामुळेच ग्रामीण भागात आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर व प्रेम होते.
पत्रकारिता, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राबद्दल त्यांना नेहमीच विशेष आस्था होती. पत्रकार म्हणून त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या आणि सामाजिक विषयांना वाचा फोडली.
या शोकसभेत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाई देऊलकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, समीर वंजारी, रमेश बोंद्रे, चंद्रकांत कासार, अभिमन्यू लोंढे, सुरेश भोगटे, सुधीर पराडकर, रुपेश राऊळ, रमेश गावकर, गजानन नाईक, संदीप टोपले, प्रा. रुपेश पाटील, विनायक गावस आदी मान्यवरांनी वाडकर यांच्या आठवणींना उजाळा देत शोकसंवेदना व्यक्त केल्या.











